करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, या उपाययोजनांसाठी निधीची गरज असून, सरकारनं कंपन्यांकडं धाव घेतली आहे. आज दुपारी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात उपद्रव करणाऱ्या करोना संसर्गाला थांबवण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसली आहे. यासंदर्भात सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. करोनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्या बैठकीला जाण्यापूर्वी टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज्यातील करोनाबाधितांचा आकडा स्थिर आहे. सध्या राज्यात ३९ करोनाबाधित रुग्ण आहेत. सध्या करोनाचा संसर्ग रोखण्याला सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळवी. खाजगी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना द्याव्या,’ असं आवाहन त्यांनी केलं.

करोनाचा सामना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देणार आहोत. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. करोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी कंपन्यांनी मदत करावी. सीएसआर निधीतून ही मदत करावी. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य कंपन्या देऊ शकतात. सरकारकडून सर्व कंपन्यांना आवाहन केलं जाणार आहे,’ असं टोपे म्हणाले.

दरम्यान, शभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. थैमान घालणाऱ्या करोनानं महाराष्ट्रात पहिला बळी घेतला. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील करोनाग्रस्त मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. दुबईहून परतल्यानंतर करोनाची लागण झाली असल्यानं त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. ६४ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.