राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैन्य बोलावणं ही अगदी शेवटची वेळ आहे, पण गरजच पडली तर त्याचा विचार करता येईल असं म्हटलं आहे. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर स्प्ष्ट उत्तर दिलं. “९० टक्के लोक प्रामाणिकपणे नियमांचं पालन करताना दिसत आहे. पण १० टक्के लोक अद्यापही रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत,” असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी एका व्यक्तीने शरद पवार यांच्याकडे जनता सुधारणार नाही सैनिकांना बोलवा अशी मागणी केली. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितलं की, “आपल्याकडे एनजीओ कार्यकर्त्यांची मोठी फौज सध्या काम करत आहे. सैन्य बोलावणे ही अगदी शेवटची वेळ आहे. सैन्य हे परकियांच्या विरोधात बोलवायचं असतं स्वकियांच्या नाही. त्यामुळे आवश्यकता नाही तोपर्यंत आपण सैन्याचा विचार करु नये. गरजच पडली तर त्याचा विचार करता येईल”.
आणखी वाचा- मरकजच्या कार्यक्रमामुळे देशभरात परिणाम, महाराष्ट्रात असं घडू देऊ नका : शरद पवार
लॉकडाउन झालं आहे पण अजूनही लोक रस्त्यांवर फिरत आहे, तर ते अजून कठोर करावं का ? असं विचारलं असता शरद पवारांनी सांगितलं की, “काहीजण नियम पाळत नाहीत आणि याची किंमत सर्वांना मोजावी लागते. त्यामुळे आता राज्य सरकार याचा विचार करत आहे. पोलिसांनी भूमिका घेतली तर त्याबद्दलची नाराजी व्यक्त केली जाते. पण पोलिसांनी भूमिका घेतलीच पाहिजे. लॉकडाउनमध्ये काळजी घेतली नाही तर फैलाव वाढेल आणि केंद्र, राज्य सरकारला लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल, त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे”.
दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमावर शरद पवार यांनी सांगितलं की, ‘दिल्लीत आयोजित करण्यात आलेला मर्कझचा कार्यक्रम टाळायला हवा होता. त्यामुळे देशात परिणाम होऊ शकतात. सामूहिकपणे येणं टाळायला हवं. मुस्लीम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी,’ असं शरद पवार म्हणाले. आजची स्थिती लक्षात येऊन काही पथ्य पाळणं गरजेचं आहे असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.करोनाची स्थिती पाहता बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पुढे नेणं शक्य आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.
आणखी वाचा- महाराष्ट्र बनले करोनाचे हॉटस्पॉट!
“लॉकडाउनच्या काळात लोकांनी सरकारच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण गरजेचं आहे. या काळात तुम्ही वाचन वाढवलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख या व्यक्तीचं साहित्य आणि प्रेरणादायी चरित्र वाचावी,” असा सल्ला शरद पवारांनी तरुणांना दिला.