राज्यभरात लागू असलेल्या टाळेबंदीत दारूचे सर्वच दुकाने बंद असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. असे असले तरी काळाबाजारात विदेशी मद्याचे वाढते दर पाहता तळीरामांची पावले आता ताडीच्या गुत्त्याकडे वळू लागली आहे. त्यामुळे ताडीच्या गुत्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, येथे सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नसल्याने करोनाची भीती व्यक्ती केली जात आहे.

टाळेबंदी लागू झाल्यापासून वसई, विरारमधील सर्वच दारूचे दुकाने बंद आहेत. यामुळे ज्यांना दारूची सवय आहे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. यात चोरीछुप्या पद्धतीने काही ठिकाणी दारू विकली जात असली तरी त्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अधिक टाळेबंदीत आर्थिक झळ सोसणाऱ्या नागरिकांना दारूसाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्याने आता त्यांनी स्वस्तात मिळणाऱ्या ताडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यात वसई, विरारमधील ताडी विक्री केंद्रावर रांगाच्या रांगा लागत आहेत. पहाटे चार वाजल्यापासून तळीराम हातात बाटल्या घेऊन रांगेत उभे राहत आहेत. यात शारीरिक दुरीकरणाचे सारेच नियम पायदळी तुडवले जात आहेत. येथे येणारी लोक साधा तोंडाला रुमालसुद्धा बांधत नाहीत. यामुळे या लोकांना करोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

विरार पश्चिम येथील बोळींज येथील एका ताडी विक्रीकेंद्रावर पहाटे चार वाजल्यापासूनच तळीराम आपला तळ ठोकून उभे राहत आहेत. येथे ही ५० रुपये लिटर दराने केवळ २ लिटर ताडी एका व्यक्तीला दिली जात आहे. यावेळी लोक मोठी गर्दी करत रांगेत एकमेकांना खेटून उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. टाळेबंदी असतानाही ताडीचे गुत्ते सरू असल्याने आसपासच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.