तीन मतदारसंघांमध्ये समीकरण बदलणार

जितेंद्र पाटील, जळगाव</strong>

विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागलेले असतांना शहरातील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल घोषित झाल्याने जिल्ह्यात जणू राजकीय भूकंप झाला आहे. न्यायालयीन निकालाचा मोठा फटका प्रामुख्याने सेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बसला असून जळगाव शहर आणि ग्रामीण तसेच चोपडा मतदारसंघातील राजकीय समीकरण त्यामुळे बदलण्याची शक्यता आहे.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख संशयित सुरेश जैन हे जळगाव मतदारसंघातील सेनेचे उमेदवार होते. जैन यांना पूर्वीच्या युती सरकारने मंत्रिपद बहाल केले होते. राजकीय महत्वाकांक्षेतून त्यांनी त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीत प्रवेश केला. तिथेही मन न रमल्यामुळे पुन्हा ते राष्ट्रवादी सोडून सेनेत परतले. अलीकडील काही वर्षांत त्यांनी पक्ष बदललेला नसून सेनेच्या ध्येय धोरणांवरच निष्ठा ठेवली आहे. उल्लेखनीय म्हणजे अनेकवेळा पक्ष बदलूनही जळगाव शहर, तालुका तसेच पालिकेवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यात जैन नेहमीच यशस्वी ठरले. सुरेश जैन यांचे जिल्ह्यातील राजकारणात कट्टर विरोधक कोणी असतील तर ते भाजप नेते एकनाथ खडसे. विधानसभेसह पालिकेच्या निवडणुकीत जैन यांचा विजयरथ रोखण्यासाठी खडसे यांनी अनेकवेळा प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु, ते प्रत्येकवेळी अपयशी ठरले. अपवाद गेल्यावेळची विधानसभा निवडणूक ठरली.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांमुळे जैन हे कारागृहात असल्याचा लाभ मिळाल्याने भाजपचे सुरेश भोळे मोठय़ा फरकाने निवडून आले. हक्काच्या जागेवर त्यामुळे सेनेला पाणी सोडावे लागले. त्याचे शल्य जैन यांच्यासह सेनेला सातत्याने बोचत असतांना आता निवडणुकीसाठी युती झाल्यास ही जागा भाजप सोडण्याच्या मानसिकतेत नाही.

दरम्यान, जैन यांनी आपण पुन्हा जळगावमध्ये निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली होती. परंतु, घरकुल प्रकरणाचा निकाल लागला आणि जैन यांच्या जळगावमधून पुन्हा उभे राहण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. सुंठीवाचून खोकला गेल्याने भाजपमध्ये अर्थातच आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

गुलाबराव विरूद्ध गुलाबराव लढतीस पूर्णविराम

विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादीला गुलाबराव देवकर यांच्या रूपाने जनसामान्यांशी नाळ जुडलेला उमेदवार दोन पंचवार्षिकपासून लाभलेला होता. सेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांचा पराभव करून एकदा कृषी राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारणारे देवकर हे अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत पोहोचले होते. जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांना कडवी झुंज देणाऱ्या देवकर यांना शिवसेना नेहमीच पाण्यात पाहत असे. विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर विरुध्द गुलाबराव पाटील यांच्यात काटय़ाची लढत ही ठरलेली असायची. २०१४ च्या निवडणुकीवेळी देवकर हे घरकुल गैरव्यवहाराच्या आरोपामुळे कारागृहात असतांना सेनेने जळगाव ग्रामीणची जागा सहज जिंकली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही खासदारकीचे उमेदवार असलेल्या देवकरांना जळगाव ग्रामीण मतदारसंघात फार मते मिळू शकली नाहीत. घरकुल प्रकरणात पाच वर्षांचा तुरूंगवास आणि दंड सुनावण्यात आल्यानंतर आता देवकरांच्या राजकीय कारकिर्दीलाच ग्रहण लागले आहे.

चोपडय़ाची जागा सेनेसाठी आव्हानात्मक

विधानसभेच्या चोपडा मतदार संघातील सेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांनाही जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या चोपडा मतदारसंघात सेनेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सोनवणे यांचा मोठा वाटा राहिला. सोनवणे यांनी यावेळी पुन्हा निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने चोपडा शहर, तालुक्यात मोर्चेबांधणी केली होती. विश्वासात न घेता परस्पर काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे खुद्द सेनेत त्यांचे बरेच हितशत्रू अलीकडे निर्माण झाले होते. जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाच्या निकालामुळे सोनवणे यांच्या इच्छांवर पाणी फेरले गेले आहे. सोनवणे यांच्या उमेदवारीवर गंडांतर आल्याने राष्ट्रवादीची आशा पल्लवित झाली आहे. गेल्यावेळी चोपडय़ात राष्ट्रवादीच्या माधुरी पाटील यांना सोनवणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता