सोलापूर : मानहानीच्या खटल्यात सूरत न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर भाजपने ज्या टिळक चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले, त्याच टिळक चौकात युवक काँग्रेसने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून भाजपला प्रत्युत्तर दिले. स्वातंत्र्य लढ्यात झालेल्या अनेक आंदोलनांसह ऐतिहासिक सभांची साक्ष देणाऱ्या टिळक चौकात सोलापूर शहर भाजपने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले होते. आमदार विजय देशमुख व पक्षाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते.

या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने याच टिळक चौकात भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करताना राहुल गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि भाजपने देशाची संपूर्ण लोकशाहीच नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.

हेही वाचा >>> सातारा: “टोलनाका चालविणाऱ्यांनी मला शहाणपणा शिकवू नये…” शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांनी अदानी आणि मोदी यांच्यात काय संबंध आहेत, यावर प्रश्न उपस्थित करणे मोदी व भाजपसाठी अडचणीचे ठरले आहे. म्हणूनच राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरीही जनता त्यांचे तोंड बंद करणार नाही, असा विश्वास गणेश डोंगरे यांनी व्यक्त केला. या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत गाडेकर, शरद गुमटे, प्रवीण वाले, यासीन शेख, तिरूपती परकीपंडला, संजय गायकवाड, आदित्य म्हमाणे आदींचा सहभाग होता.