देशातील करोना रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील काही दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. मुंबईमध्ये रविवारी विक्रमी १४४ रुग्ण आढळून आले. मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीमधील चर्चेनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मास्क सक्तीवर बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता
राज्यात पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृतीगटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीबाबत आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. त्यानंतर संबंधितांशी विचारविनिमय करून राज्य सरकार मास्क सक्तीबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बैठकीला अधिकारीही राहणार उपस्थित
देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि या दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये असतील. या बैठकीमध्ये करोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी राज्यांना निर्देश देण्याबरोबरच काही धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

आकडेवारीवर होणार चर्चा…
समोर आलेल्या माहितीनुसार आरोग्य सचिव राजेश भुषण हे या बैठकीमध्ये सध्या देशातील करोना परिस्थितीसंदर्भात एक प्रेझेन्टेशन देणार आहेत. यामध्ये ते करोना लसीकरणासंदर्भात आणि विशेष करुन बुस्टर संदर्भात माहिती देणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे याची सविस्तर आकडेवारी या बैठकीमध्ये सादर केली जाणार आहे.

डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे काय चिंता व्यक्त केली?
महाराष्ट्रात करोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्या वाढत आहे. चीनसह काही देश आणि देशातील काही राज्यांमध्येही करोना रुग्ण आढळून येत आहेत. करोना विषाणूंचे उत्परिवर्तन हा चिंतेचा विषय असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत व्यक्त केले.

…म्हणून मास्क सक्तीचा विचार
राज्यात मास्क सक्ती काढून टाकण्यात आली व तिचा वापर ऐच्छिक ठेवण्यात आला. तेव्हापासून बहुसंख्य नागरिकांना मास्कचा वापर बंद केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही गर्दीच्या ठिकाणी तरी मास्क वापर सक्तीचा करण्यासाठी राज्य सरकार पावले टाकण्याचा विचार करीत आहे, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीत मास्क सक्ती हटवली अन्…
दिल्लीमध्ये मास्क सक्ती हटवण्यात आल्यानंतर दोन आठवड्यांनी एप्रिलच्या मध्यातच रुग्णसंख्या वाढू लागली. रुग्णसंख्या कमी झाल्याने दिल्ली सरकारने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शाळा पुन्हा सुरु करत मास्क सक्ती हटवली होती. पण एप्रिलच्या मध्यातच रुग्णसंख्या वाढू लागली आणि दोन आठवड्यात १०० वरुन एक हजारवर पोहोचली. पण याआधी दिल्लीत झालेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत ही वाढ तितकी नाही.

या राज्यांनी पुन्हा केलीय मास्क सक्ती…
रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा दिल्ली तसंच शेजारील राज्यं हरियाणामधील चार आणि उत्तर प्रदेशमधील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे.

मास्कबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?
भारतीय वैद्यकीय संशोधक संस्थेच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर ललित कांत यांनी मास्क सक्ती काढल्यानंतर रुग्णसंख्या वाढू शकते असं म्हटलंय. “लोकांनी मास्क काढल्यानंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होणं अपेक्षित होतं. ही रुग्णसंख्या कमी जास्त होत राहणार आहे. मात्र गंभीर आजार आणि होणारे मृत्यू यासंबंधीची आकडेवारी जास्त महत्वाची आहे,” असं कांत म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 meeting with pm modi maharashtra to review mask compulsion decision scsg
First published on: 27-04-2022 at 09:32 IST