सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीतील गावे पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले आहे. यामुळे आता येथील सुमारे ३२ खनिज प्रकल्प कायमस्वरूपी बंद होतील, अशी अपेक्षा वनशक्ती व आवाज फाऊंडेशनचे विश्वस्त स्टॅलिन यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> दीड महिन्यात ४,६५० कोटींची विक्रमी जप्ती
२५ गावे पर्यावरणदृष्टया संवेदनशील (इको-सेन्सिटीव्ह) जाहीर करण्याबाबत निर्णय येत्या ४ महिन्यात घ्यावा, अन्यथा याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असे आदेश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना दिले आहेत. यावर पत्रकार परिषदेत भाष्य करताना स्टॅलिन म्हणाले, की हा पर्यावरणीय संवेदनशील अहवाल सरकारने दाबून ठेवला आहे. कळणे खनिज प्रकल्पाच्या कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे तो बंद होईल. मात्र संवेदनशील क्षेत्रात पर्यावरण पूरक विकास व पर्यटन विकास होऊ शकतो. ६२८ क्षेत्रांमध्ये वृक्षतोड झाली असल्याने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली जाईल, असे स्टॅलिन म्हणाले. यावेळी संदीप सावंत, डॉ. सतीश लळीत,नंदकुमार पवार, अस्मिता एम. जे. आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांची १४ वर्षांची लढाई यशस्वी झाली आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाद्वारे हा पट्टा श्रीमंत होईल. येथे निसर्गाला जपून विकास होईल. हरित प्रकल्पाला आमचा पाठिंबा राहील. – डॉ. जयेंद्र परुळेकर, पर्यावरणप्रेमी