राज्यात मागच्या १५ दिवसांतील सकारात्मक चित्र

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : मागच्या १५ दिवसांत करोनाचा प्रभाव कमी झाला असून एकूण चाचण्यांपैकी केवळ १.३३ टक्केच नागरिकांचा अहवाल सकारात्मक आला आहे.  दिवाळीच्या आनंददायी काळात हे समाधानकारक चित्र दिसत असल्याने नागरिकांसह आरोग्य विभागालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही आठवड्यांमध्ये झपाट्याने खाली आली आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालातून मिळवलेल्या आकडेवारीच्या मदतीने केलेल्या अभ्यासानुसार, २ नोव्हेंबरला राज्यात १५ हजार ४८५ सक्रिय करोनाग्रस्त होते. याआधी राज्यात १९ ऑक्टोबर २०२१ ते २ नोव्हेंबर २०२१ या पंधरा दिवसांच्या काळात शासकीय प्रयोगशाळेत ८ लाख ४९ हजार ६८ (५३.६७ टक्के), खासगी प्रयोगशाळेत ७ लाख ३२ हजार ७६० (४६.३३ टक्के) अशा एकूण १५ लाख ८१ हजार ८२८ चाचण्या झाल्या. त्यातील शासकीय प्रयोगशाळेत ७ हजार ६१८, खासगी प्रयोगशाळेत १३ हजार ५०५ अशा एकूण २१ हजार १२३ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. सकारात्मक अहवालाचे हे प्रमाण शासकीय प्रयोगशाळेत चाचण्यांच्या तुलनेत ०.८९ टक्के तर खासगी प्रयोगशाळेत १.८४ टक्के आणि दोन्ही प्रयोगशाळेतील मिळून १.३३ टक्के नोंदवले गेले.  राज्यात मार्च २०२० मधील पहिल्या करोना संशयितांच्या चाचणीपासून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शासकीय प्रयोगशाळेत ३ कोटी ९० लाख ५८ हजार ५६९, खासगी प्रयोगशाळेत २ कोटी ३५ लाख ६८ हजार ७३२ अशा एकूण ६ कोटी २६ लाख २७ हजार ३०१  चाचण्या झाल्या.