महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभर विविध उपक्रमांना प्रारंभ करण्याचे सूतोवाच पंतप्रधानांनी केले आहे. मात्र गांधीजिल्हा म्हणून परिचित असलेला वर्धा जिल्हा या जयंतीपर्वाला बलात्कार, खून, क्रिकेटसट्टा, अवैध दारू व गांजाविक्रीने सामोरे जाणार काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

जयंतीपर्व वर्धा जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात साजरे करण्यासाठी गांधीवाद्यांसह अन्य संघटना निरनिराळ्या उपक्रमांची आखणी करीत आहे. ऐतिहासिक क्षणांना जिवंत करण्याचे जोरदार प्रयत्न मात्र या जिल्हय़ातील भयप्रद वातावरणात झाकोळून जात असल्याची भावना वाढू लागली आहे. समीर मेटांगळे खून प्रकरणापासून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघायला सुरुवात झाली. या प्रकरणात जाहीर रोष व्यक्त झाल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी स्वत: दखल घेत प्रकरण हाताळले. तेव्हाच हा उद्रेक शांत झाला. पुढे महिन्याभरातच आणखी एका युवकाचा खून झाला. अवैध गांजाविक्रीचे रहस्य त्यातून पुढे आले. १९ मार्चला शुभांगी उईके या विद्यार्थिनीवर बलात्कार करीत खून करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले. गोंडवाणा परिषदेचे अवचितराव सयाम म्हणतात की, या प्रकरणात पोलिसांची तपासाची दिशाच चुकली असून आत्महत्येचा देखावा उभा केला गेला. गुन्हेगारास वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. मृत युवतीचे कपडे, शवविच्छेदन, रेल्वे गाडीचा वेळ व अन्य बाबी पोलिसांच्या ढिसाळ कारवाईचा पुरावाच आहे. पोलीस अधीक्षक या तपासाबाबत आम्ही समाधानी आहे, असे सांगत असतील तर ते खोटे आहे. तपास सक्षम अधिकारी किंवा अन्य यंत्रणेकडे देण्याची मागणी आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंगणवाडी सेविकेवर बलात्कार झाला. त्यातील आरोपी मोकाट असून कारवाईच होत नसल्याची कर्मचारी संघटनेची भावना आहे. हिंगणघाट येथील भावेश चंदानी याने २० मार्चला आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले. परंतु अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. शहरातून मोर्चा निघाल्यावर वरिष्ठांनी सूत्रे हाती घेतली. मात्र या प्रकरणातून क्रिकेटसट्टा उजेडात आला आहे. क्रिकेटच्या सट्टय़ावर युवक पैसे उधळत आहे. सावकारीचा पैसा व त्यातून येणारे दडपण युवकांना भयग्रस्त करणारे ठरत आहे. अवैध दारूविक्रिच्या शापातून जिल्हा मुक्त होणे शक्य नाही. मात्र त्याला आवर घालण्याचे किमान प्रयत्न व्हावे, अशी जनतेची अपेक्षा चुकीची नाही. लोकप्रतिनिधींनी दारू पकडून दिल्यावर पोलिसांनी कारवाई करावी, यापेक्षा लांच्छनास्पद बाब नसावी.

अशा विविध तऱ्हेच्या गुन्हय़ांचा व आरोपांचा डोंगर पोलिसांपुढे उभा आहे. मात्र कारवाईची पावले मंदगतीने का पडतात, याचे उत्तर जनतेला हवे आहे. प्रत्येक ठाणेदार हा पोलीस अधीक्षक असल्याच्या थाटात वावरण्याची बाब तर संताप निर्माण करणारी ठरावी. तक्रार करण्यास गेलेला फिर्यादी आरोपी होऊ शकतो. बेमुर्वतपणे उत्तरे देणारे कनिष्ठ अधिकारी पाहून तक्रार न केलेलीच बरी, अशा भावनेस जन्म देते. अवैध दारूविक्री अनावर होत असतानाच त्यात गांजा विक्रीची भर पडू लागली आहे. आम्हाला हे एकच काम आहे का, असा प्रत्येक पोलीस अधिकऱ्याचा प्रश्न असतो.

पोलीस अधीक्षक एस. निर्मलादेवी म्हणतात की, केवळ आरोप आहे म्हणून गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाही. तथ्यावर तपास होतो. मी कुणाच्या दबावाखाली काम करणारी नाही. उईके प्रकरणात सर्व संबंधितांचे समाधान झाले आहे. ती आत्महत्याच होती. एका बलात्कार प्रकरणात वैद्यकीय तपासणी झाली. अहवाल ‘नील’ आहे. सट्टा प्रकणात मी स्वत: लक्ष घालत आहे. त्याचे परिणाम लवकरच दिसतील.

किमान अवैध दारू विक्रीवर तरी आळा बसावा, अशी अपेक्षा आहे. पोलिसांची धाड पडल्यावर दोनच दिवसांत परत गुत्ते सुरू होतात, याला काय म्हणावे. ठाणेदारांवर वचक नसल्याच्या तक्रारी होतात. ते तपासावे लागेल. परंतु परिस्थितीत खूप सुधारणा होण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. पंकज भोयर, आमदार