scorecardresearch

विशाल फटे पोलीस कोठडीत

काही महिने मोठ्या प्रमाणात परतावा मिळाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि पुन्हा गुंतवणूक वाढत गेली.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

सोलापूर : शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत विशालका कन्सल्टन्सी सव्हिर्सेस कंपनीच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला विशाल अंबादास फटे (वय ४५, रा. बार्शी) यास बार्शीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

या शेअर घोटाळ्यात प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार फसवणुकीचा आकडा १८ कोटींपेक्षा अधिक आहे. या घोटाळ्यात सुरुवातीला दीपक आंबरे या गुंतवणूकदाराने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पाच कोटी ६३ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. यात विशाल फटे याच्यासह त्याचे वडील अंबादास गणपती फटे, आई अलका, पत्नी राधिका आणि भाऊ वैभव या पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल आहे. यातील अंबादास फटे व त्यांचा मुलगा वैभव यांना यापूर्वीच अटक झाली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर विशालची आई आणि पत्नी अद्यापि फरारी आहे. विविध तीन कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून विशाल फटे याने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी शेकडो मध्यमवर्गीयांसह बडे नेते, उद्योजक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींच्या रकमा उकळल्या. काही महिने मोठ्या प्रमाणात परतावा मिळाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि पुन्हा गुंतवणूक वाढत गेली. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी फटे व त्याचे कुटुंबीय अचानकपणे बेपत्ता झाले. त्यांचे घर आणि कार्यालयही बंद होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crime news vishal fate police custody akp

ताज्या बातम्या