जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल झाले. मात्र, यात कोणाला शिक्षा झाल्याचे अजूनही समोर आले नाही. त्यामुळे हे गुन्हे नावालाच ठरतात काय, अशी चर्चा आता होत आहे.
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत आचारसंहिताभंगाबाबत २३ गुन्हे दाखल झाले. उपविभागीय व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. याबरोबरच ७२ वाहनचालकांवर गुन्हय़ांच्या नोंदी आहेत. आचारसंहिताभंग होऊ नये, या दृष्टीने काळजी घेण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम कासार यांनी सर्व विभागांना वारंवार बठका घेऊन सूचना दिल्या होत्या. आचारसंहिता भंग होईल. त्या ठिकाणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला होता, मात्र उपविभागीय अधिकारी एम. बी. नालावाड निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतरही कार्यालयात गरहजर होते. उमाजी बोथीकर यांनी १२ सप्टेंबरला िहगोली शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून निवडणूक कामात टाळाटाळ केल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आचारसंहिताभंगाचा हा पहिला गुन्हा ठरला.
निवडणुकीच्या काळात पोस्टर, फलक झाकून ठेवण्याचे आदेश असताना डोंगरकडा येथील ग्रामविकास अधिकारी भारत पोपलाईट यांनी याचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल झाला. भाटेगाव शिवारात वीज कंपनीच्या खांबावर एकाने उमेदवाराचा ध्वज लावला. याबाबत आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. याशिवाय वाहनावर ध्वज, बॅनरची परवानगी नसताना हा वापर करणाऱ्या ७२ वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला.