अहिल्यानगर: शहरात चोऱ्या, घरफोड्या, वाहनचोरी, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना वाढल्या असून, त्या रोखण्यात व गुन्हेगारांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप करत आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या संदर्भात त्यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले. या वेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, विपुल शेटीया, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, अभिजित खोसे, दीपक खेडकर, सुमित कुलकर्णी, संतोष बोरा, गोपाळ मणियार, राजेंद्र बोथरा, अशोक भंडारी, संजय लोढा, दीपक नवलानी, रमेश दुल्लम, गिरीश खूपचंदानी, प्रतीक बोगावत, दीपक खंडेलवाल, यश तळरेजा, केतन मुथा आदी उपस्थित होते.

दरम्यान रात्री चोरट्यांनी शहरातील चितळे रस्ता, सर्जेपुरा भागातील चार दुकाने फोडून चोऱ्या केल्या. यामध्ये दोन ते अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

आमदार जगताप यांनी सांगितले की, शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंद घरे फोडली जात आहेत, महिला व वृद्धांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात आहेत, तर घरासमोरील वाहनेही सुरक्षित नाहीत. एका भागात गाडी चोरीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागातही तशीच घटना घडणे म्हणजे पोलिसांची गस्त अपुरी आहे, असा आरोपही त्यांनी केला.

चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद होतात, तरीही पोलीस कारवाई होत नाही. अवैध धंद्यांना पोलिसांकडून मदत मिळते, असाही आरोप या निवेदनात केला आहे. अवैध धंद्यामुळे रात्री ११ नंतर गुन्हेगारांची वर्दळ वाढणे, ही परिस्थिती धोकादायक असल्याकडे लक्ष वेधले.

शहर व उपनगरातील बाजारपेठातून अनेक चोऱ्या झाल्या, मात्र ठिकठिकाणी नाकेबंदी, रात्रीची गस्त असे प्रतिबंधात्मक उपाय पोलीस करताना दिसत नाहीत, याकडे लक्ष वेधताना आमदार जगताप यांनी काही उदाहरणेही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणली. सकाळी, सायंकाळी पायी फिरण्यास जाणाऱ्या महिला एकट्या दिसल्या की त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले जाते. एकाच भागातून सलग दोन तीन दिवस वाहने चोरीला जातात. याचा अर्थ पोलीस बंदोबस्तात कमी पडत आहेत असाही आरोप त्यांनी केला.