सांगली : इस्लामपुरात एका गुन्हेगाराचा पाठलाग करून धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तीन संशयित स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले असले, तरी भर दिवसा झालेल्या खुनाच्या घटनेने शहर हादरले आहे.
पोलीस दप्तरी गुन्हेगार म्हणून नोंद असलेल्या रोहित पंडित पवार (वय २५, रा. बेघर वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक देवघेवीच्या कारणातून हा खून झाल्याचा प्राथमिक कयास असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, याबाबत सखोल चौकशी केल्यानंतरच खुनामागील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी सांगितले.
मृत पवार या तरुणावर आज दुपारी तीन हल्लेखोरांनी कारखाना रस्त्यावर असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पाळत ठेवून धारदार हत्याराने हल्ला केला. हल्लेखोरांकडून जीवघेणा हल्ला होणार हे लक्षात येताच पवार याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करत त्याच्या मानेवर, डोक्यात धारदार हत्याराने वार करण्यात आले. एका घाव डोक्यात वर्मी बसला. घाव बसलेल्या ठिकाणीच धारदार हत्यार रुतून बसले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला डोक्यात रुतलेल्या हत्यारासह उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दुचाकीवरून नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच अतिरक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत तरुणाचे नातलग, मित्र यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. दरम्यान, खुनाची घटना घडल्यानंतर तीन संशयितांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन हल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. या तीन संशयितांची नावे पोलिसांनी उशिरापर्यंत स्पष्ट केलेली नाहीत. आर्थिक देवघेवीतून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.