मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील लोकांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे. याबाबत आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश मधील नागरिकांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांना विरोध करणे म्हणजे छत्रपतीच्या विचारांना विरोध करण्यासारखे आहे असे केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी म्हटले आहे. तसेच पाठीत खंजीर खुपसल्याने तुम्ही एवढं रक्तबंबाळ आहात तर काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत राहणे योग्य नाही, असेही रामदास आठवले म्हणाले.

“राज ठाकरेंनी शांततेच्या मार्गाने जायला पाहिजे. राज ना अयोयोध्यत जाण्याचा अधिकार आहे.पण जसे काही संघटना मागणी करतात त्याप्रमाणे त्यांनी उत्तर प्रदेश मधील नागरिकांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांना विरोध करणे म्हणजे छत्रपतीच्या विचाराना विरोध करण्यासारखे आहे. कारण शिवराज्याभिषेक करण्यास राज्यातील काही ब्राह्मणांनी विरोध केल्यानंतर गागाभट्ट यांना उत्तरेतून बोलावले होते. राज ठाकरे यानी आता नरमाईने वागायला हवे,” असे रामदास आठवले म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांना सरकार मधून बाहेर पडण्याबाबत आवाहन केले आहे. “पाठीत खंजीर खुपसल्याने तुम्ही एवढं रक्तबंबाळ आहात तर काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत राहणे योग्य नाही. काँग्रेसने  सरकारमधून बाहेर पडावे असा नाना पटोले यांना माझा सल्ला आहे. एवढा अपमान होत असेल तर काँग्रेसने आपला स्वाभिमान जिवंत ठेवावा. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार चालवत आहे. काँग्रेसला या सरकारमध्ये काही महत्व नाही,” असे रामदास आठवले म्हणाले. तसेच राज ठाकरे यांना घेऊन भाजपाचा  फायदा होणार नाही, असेही रामदास आठवले म्हणाले.