आठवले महाराष्ट्रातील लालू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मी मात्र त्यांना ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे भालू असे म्हणणार नाही, असे सांगत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी राज यांचा समाचार घेतला.महायुतीचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी आठवले लातुरात आले होते. पत्रकार बैठकीस माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, अॅड. बळवंत जाधव, नागनाथ निडवदे, चंद्रकांत चिकटे, संभाजी पाटील निलंगेकर, देवीदास कांबळे आदी उपस्थित होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आठवले यांनी मोकळीढाकळी उत्तरे दिली.केंद्रात गृहमंत्री होणार की राज्यात उपमुख्यमंत्री, या प्रश्नाला उत्तर देताना आठवले यांनी सध्या तरी ५ वर्षे केंद्रातच राहण्याचा विचार असल्याचे सांगितले. फायद्याचे राजकारण आपण शरद पवार यांच्याकडून शिकलो असून, कोणत्या वेळी राजकारणात खेळी करायची हा धडा आपणाला मिळाला असल्याचे ते म्हणाले. देशभर नरेंद्र मोदी यांची हवा आहे. दलित समाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. मतपेटीतून तो आपला संताप व्यक्त करेल. राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.मनसेला एकही जागा मिळणार नाही. त्यामुळे मोदींना पंतप्रधानपदासाठी त्यांनी पािठबा देण्याचा दावा राज ठाकरेंनी केला, तरी त्याचा उपयोग काय? असा प्रश्न त्यांनी केला. एखादी जागा मनसेला मिळालीच तर त्यांचा पािठबा घेऊ नये, यासाठी आपण आग्रही राहू. मनसे महायुतीत आली तर आम्ही वेगळा विचार करू, असा इशाराही त्यांनी दिला. येथील कल्पना गिरी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मुलायमसिंगांच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. पत्रकार बैठकीनंतर कल्पना गिरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची आठवले यांनी भेट घेतली.‘रिपाइंचे कार्यकत्रे कामाला लागतील’निवडणुकीत मानसन्मानाचे विषय उपस्थित होतात. लातुरातील कार्यकर्त्यांच्या काही अडचणी होत्या. आता सर्व कार्यकत्रे एकजुटीने कामाला लागणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.