सांगली : सप्टेंबर महिन्यातील उत्तरा व हस्त नक्षत्रामध्ये झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून याचा फटका ९६ हजार शेतकऱ्यांना बसला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांनी मंगळवारी सांगितले. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सरासरी पावसाच्या दीड पट पाऊस कोसळला असून सर्वाधिक पाऊस जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात झाला. सप्टेंबर महिन्यातील जिल्ह्याची पावसाची सरासरी १३८.६ मिलीमीटर असताना प्रत्यक्षात २०३ मिलीमीटर पाऊस पडला. सरासरीच्या १४६.५ टक्के पाऊस झाला असल्याचे उपलब्ध पावसाच्या नोंदीवरून स्पष्ट होते.
सर्वाधिक पाऊस कवठेमहांकाळ तालुक्यात २८४.४ मिलीमीटर पडला. या तालुक्यात या महिन्यातील पावसाची सरासरी १२७.९ मिलीमीटर असताना प्रत्यक्षात सव्वादोन पट पाऊस झाला. तर आटपाडी तालुक्याची सरासरी २६.४ ची असताना यंदा ३०३ मिलीमीटर पाऊस पडला. कमी कालावधीत अधिक पाऊस यंदा झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कांदा या पिकाबरोबरच द्राक्ष व डाळिंब या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार जिल्ह्यात ५१ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये जिरायती क्षेत्र १६ हजार ९६५, बागायती २२ हजार ३३७ आणि फळ पिकाचे १२ हजार ८४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचा ९६ हजार १८६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक शेतकरी कवठेमहांकाळ तालुक्यातील असून या तालुक्यात ४० हजार ६०२ शेतकऱ्यांचे सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. अन्य तालुकानिहाय नुकसान झालेली शेतकरी संख्या अशी मिरज २३०५, तासगाव १७ हजार २२०, वाळवा १३४, अप्पर आष्टा ११, शिराळा २६, विटा ७१५, आणि जत १५ हजार ५१.
जत तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या अप्पर संख विभागातील तिकोंडी, मुचंडी या मंडळात अतिवृष्टी झाली. तसेच कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी तालुक्यात बेमाप पावसाने माणगंगा तर दुथडी भरून वाहती झालीच, पण डाळिंबाच्या बागांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने झाडांच्या मुळ्या कुजू लागल्या आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळछाटणी झालेल्या झाडांचे वलांडे खराब तर झाले आहेतच, पण कोवळे घडही पावसाने गळून पडले आहेत, तर काही घडांमध्ये पाणी साचल्याने फळकुज सुरू झाली आहे. पावसानंतर केलेल्या नजर अंदाजाने जिल्ह्यातील ५१ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, प्रत्यक्षात पंचनामे केल्यानंतरच किती नुकसान झाले हे समोर येणार आहे. विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधीक्षक.