राहाता : निर्मळ पिंपरी शिवारात आयोजित केलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमात पाकीटमारी, सोन्याच्या चैन चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकूण २३ महिला व ५ पुरुषांना अटक करून त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

प्रदीप मिश्रा यांची १२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी लाखो भाविक सहभागी झालेले होते. सदर कथा ऐकण्यासाठी झालेली गर्दी व शिर्डीमधील मिरवणुकीत सहभागी भाविकांचे खिसे कापणे, महिलांच्या सोन्याच्या चैन कट करणे, भाविकांना मारहाण करून जबरी चोरी करणे या गैर कृत्यासाठी काही महिला व पुरुष आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. अशांवर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतले व शिर्डी व लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेले राजस्थान, हरियाणा राज्यातून व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून या गैर कृत्यासाठी आले होते. या सर्वांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्याचे वाघचौरे यांनी सांगीतले.

यापूर्वी ज्या ठिकाणी महाराजांच्या कथा आयोजित करण्यात आल्या होत्या तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली होती. विशेषतः महिला विभाग, सभामंडपात प्रवेश करावयाच्या ठिकाणी साध्या गणवेशांमध्ये पोलीस अंमलदार नेमण्यात आले होते. त्यामुळे चोऱ्या नियंत्रणात ठेवण्यात मदत झाली.

पकडण्यात आलेल्या एका महिला चोराच्या टोळीकडे तर महाराजांच्या पुढील दोन वर्षांत ज्या ठिकाणी कथा होणार आहे त्या कथांची तारीख, ठिकाण याची माहिती डायरीमध्ये मिळून आली. त्या अनुषंगाने तेथील पोलिसांना या टोळीची माहिती कळवणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यानी सांगितले.

शिर्डीत ३ सोनसाखळी चोरांना पकडले

आंध्र प्रदेश येथील साईभक्त महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धुमस्टाईलने ओरबाडून पलायन करणाऱ्या रोहित बंडू खरात (वय २८, रा. नाशिक), सुरज अमोल पोटे ( वय २६, रा. भोजडे, कोपरगाव), सुमित देवदास शेरे ( वय ३२, रा. शिर्डी) या तिघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

आरोपी रोहित खरात हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात राहाता, कोपरगाव व शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले.