Sangli Ganesh Visarjan Update सांगली : सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांची मोठी गर्दी सांगली व मिरज शहरात पाहण्यास मिळत आहे. गौरी आणि घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर अनेक नागरिक कुटुंबासह गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यास घराबाहेर पडत आहेत. सांगलीत यावर्षी नावीन्यपूर्ण देखावे मंडळाने सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले असले तरी घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर अनेक नागरिक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. देखावे पाहण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली असल्याने गणेशभक्तांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळाला आहे.
सांगली शहरातील गणपती पेठ व्यापारी गणेशोत्सव मंडळाने कृष्णलीलावर देखावा सादर केला असून, हा हालता देखावा पाहण्यासाठी महिलांसह बालगोपालांची मोठी गर्दी होत आहे. बाळगोपाळ मंडळाने चेटूकवाडी हा भीतीदायक देखावा मांडला आहे. ध्वनी व प्रकाश योजनेवर आधारित हा देखावा अंधारात पाहण्याची मौज नागरिक लुटत आहेत. वखारभाग येथील साई मंडळाने वारकरी संप्रदायावर आधारित देखावा सादर केला आहे. तर वखार भाग मित्रमंडळाने रांझा गावच्या पाटलांना महिला अत्याचाराबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेचा देखावा प्रदर्शित केला आहे.
मोटारमालक व कामगार गणेशोत्सव मंडळाने २५ कलाकारांच्या मदतीने यावर्षी शिवपार्वती विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा प्रेक्षकांसाठी सादर करण्यात येत आहे. हे कथानक सादर करण्यासाठी २५ मिनिटांचा वेळ लागत असल्याने प्रेक्षकांची गर्दी होत आहे. स्फूर्ती चौक मंडळाने कृष्णाची माखनचोरी हा देखावा प्रदर्शित केला आहे. पौराणिक दृष्यांचा देखावा सादर करण्याची परंपरा असलेल्या लक्ष्मीनारायण मंडळाने यंदाही पौराणिक कथा सांगणारा देखावा प्रेक्षकांसाठी सादर केला आहे. जगन्नाथपुरी येथील मंदिराचा देखावा कापड पेठ मंडळाने, तर झाशी चौकात छत्रपतींची न्याय व्यवस्था हा देखावा सादर केला आहे.
याचबरोबर मिरजेत देखाव्यापेक्षा उंच मूर्तींचे प्रदर्शन अनेक मंडळांनी केले आहे. यामध्ये शेतकरी कामकरी मंडळाची २१ फूट उंचीची गणेशमूर्ती अनेक भाविकांचे आकर्षण ठरले आहे. श्रीमंत गणेशोत्सव मंडळाने यंदाही उंच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बुधवार पेठ, नदीवेस, उदगाव वेस, सांगली वेस आदी ठिकाणी देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, आज गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी घरगुती गणेश विसर्जनासाठी सांगलीतील कृष्णा घाट व मिरजेतील गणेश तलाव या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. महापालिकेच्यावतीने विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सांगलीसह मिरज व कुपवाडमध्ये महापालिकेच्यावतीने विसर्जन कुंड ठेवण्यात आले असून, जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम कुंडात श्रींचे विसर्जन करण्याचे अथवा दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.