हर्षद कशाळकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग :  पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर न्याय मागायचा कुठे ?अशी गत रायगड जिल्ह्यतील वादळग्रस्तांची झाली आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे प्रशासकीय उदासीनता अशा दुष्टचक्रात येथील आपद्ग्रस्त अडकले आहेत. आदिवासी बांधवही याला अपवाद राहिलेले नाहीत. परिस्थितीने गांजलेल्या आदिवासी कुटुंबांची सध्या फरपट सुरु आहे.

३ जूनला आलेल्या निसर्ग वादळाने अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी आदिवासी वाडीतील कुटुंबांचे आयुष्यच जणू उद्ध्वस्त करून टाकले आहे. वादळाच्या प्रकोपात आदिवासी वाडीतील बहुतांश घरांची पडझड झाली. छपरे उडून गेली. घरातील धान्य सामान भांडीकुंडी यांचेही नुकसान झाले. झाडेही उन्मळून पडली. वेळीच घर सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून सर्वाचे जीव तरी वाचले.

बेघर झालेल्या या कुटुंबांनी सध्या डोंगराखाली असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. शाळेजवळील एका निवारा शेडमध्ये २३ कुटुंबातील हे दिडशे जण सध्या वास्तव्याला आहेत. मोकळ्या जागेत चुली पेटवून ते सध्या जेवण शिजवत आहेत. जवळच्या ओढय़ावरून पाणी आणत आहेत. दिवस तर निघून जातो मात्र रात्री मिळेल त्या जागेत झोपण्याची वेळ या कुटुंबावर येत आहे.

डोंगरावरील घरे मोडून पडली आहेत. तिथे पुन्हा जाणे या कुटुंबांना शक्य नाही. गेल्या पावसाळ्यात डोंगराला तडे गेले आहेत. त्यामुळे या वाडीचा संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आले आहे. शासनाने या कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. पावसाळा सरू झाल्याने आता आदिवासी वाडीवर परत जाणे आता धोक्याचे आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबांनी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत झोपडय़ा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सामानाची जुळवाजुळव करून झोपडय़ा उभारणीचे काम सुरु केले आहे. पण ही जागा वनविभागाची असल्याने आता वनकर्मचाऱ्यांनी बांधकामावर आक्षेप घेतला आहे.

त्यामुळे एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे प्रशासकीय उदासिनता अशा दुष्टचक्रात हे कुटुंब अडकून पडले आहेत. त्यामुळे आता दाद मागायची तरी कुठे? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

‘घराच्या भिंती पडल्या, कौले उडायला लागली, झाडे पडली, त्यामुळे आता परत घरात जाऊ  शकत नाही. सध्या शाळेत येऊन राहत आहोत,  पण जागा कमी पडते, म्हणून झोपडय़ा बांधायला घेतल्या, पण वन विभागाचे कर्मचारी झोपडय़ाही बांधू देत नाहीत. सारखे त्रास देतात.

-गंगाराम गडकर, आपद्ग्रस्त  

‘दोन महिने झाले, काम धंदा बंद आहे, या वादळाने घर आणि घरातले सामानही नष्ट केले आहे. झोपडय़ा बांधायला देत नाहीत. मग आम्ही जायचे तरी कुठे आणि राहायचे कुठे?’

– बामी शिद, आपद्ग्रस्त महिला

‘ वेलटवाडीच्या विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी २५ गुंठे जागा संपादित करण्याची तयारी केली आहे.  घरकुल योजनेतून सर्वाना घरे मंजूर करण्याची तजवीज ठेवली आहे. पण काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ’

 –  सचिन शेजाळ तहसिलदार 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone nisarga hit tribal family zws
First published on: 15-06-2020 at 04:38 IST