फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या विकसित आणि प्रगत महाराष्ट्राचा स्थापना दिन साजरा होण्याच्या दोनच दिवस आधी नगर जिल्ह्य़ातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावी वरच्या जातीतील मुलीशी प्रेम असल्यावरून नितीन राजू आगे या अवघ्या १७वर्षीय दलित मुलाला ज्या निर्घृण व पाशवी पद्धतीने अख्ख्या गावादेखत मारत-झोडपत, गरम सळयांनी भोसकत, लाकडी हातोडय़ाचे घाव घालत ठार केले गेले त्यामुळे १मे रोजी ‘जय महाराष्ट्र’ असा जयजयकार करायचा की ‘भय महाराष्ट्र’ असा आक्रोश करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगल कलशाभोवतीचे अमंगल
गृहमंत्री आर. आर. पाटील हे ही घटना गंभीर असून सखोल तपासाचे आदेश दिल्याचे सांगत असले तरी स्थानिक पोलीस मात्र या मुलाचा इतका छळ झालेलाच नाही, त्याला सळयांनी भोसकल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटलेलेच नाही, असा निबर पवित्रा घेत आहेत. पोलिसांना हा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार नसून तात्कालीक रागातून घडलेली साधी घटनाच वाटते. त्यामुळे दहा मुजोरांना ताब्यात घेतले गेले असले तरी नितीनचे पूर्वापार गावाबाहेर राहाणारे कुटुंब दहशतीच्या ताब्यात गेले आहे. या गावात आणि गावाबाहेर फेरफटका मारताना मंगळवारच्या घटनेच्या क्रौर्याचे शहारलेपण वातावरणात भरून राहिलेले जाणवले.
खर्डा गावची वस्ती असेल दहा अकरा हजार. नेहमीच्या गावासारखेच गाव. मंगळवारच्या बंदनंतर बुधवारी दिसण्यापुरते तरी दैनंदिन व्यवहार सुरू होते, पण त्या वातावरणातील भीती, चीड आणि उद्वेग बाहेरून गावात गेलेल्या कुणालाही सहज जाणवणारा. नितीनची हत्या आणि त्या हत्येमागील क्रौर्य ऐकून शहारणारे अधिक होते. मनातल्या मनात का होईना, असे काही घडणे कुणालाही आवडत नसले, तरी सगळ्यांची तोंडे शिवल्यासारखी बंद दिसत होती. भेदरलेल्या अवस्थेतील नितीनच्या पालकांनी बुधवारी जी कहाणी पोलिसांसमोर सांगितली, त्याने तर ऐकणाऱ्यालाही गळाठून जायला होईल.
शाळेत सध्या दहावी-बारावीचे अतिरिक्त तास घेतले जातात. त्यासाठी नितीन व ही मुलगी जात होती. सोमवारी शाळेतच हे दोघे बोलत असताना मुलीच्या भावाने पाहिले. त्याने लगेचच अन्य नातेवाईकांना बोलावून घेऊन शाळेतच नितीनला बेदम मारहाण केली. सगळ्यांसमोरून ओढत त्याला बाहेर काढून शाळेतील घंटा वाजवण्याच्या हातोडय़ाने मारहाण सुरू केली तरी कुणीही ब्रही काढू शकला नाही. त्याला मारहाण करीत जवळच असलेल्या वीटभट्टीवर नेण्यात आले. गरम सळईने चटके देत त्याला अर्धा किलोमीटरवरील कन्होबा डोंगराजवळ नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली व त्याचा गळा आवळून गळफास रचल्याचा बनाव रचण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. परंतु तो अर्धा जमिनीलाच टेकलेला होता. दहावीची परीक्षाही तो पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला होता. गावातील गोलेकर कुटुंबातील दहावीत शिकणाऱ्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच ही निर्घृण हत्या झाल्याचे सांगितले जात असले तरी धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगीच नितीनच्या एकतर्फी प्रेमात होती. ती माझ्याशी बोलते, मोबाइल नंबर मागते, असे नितीनने आईला सांगितले होते. त्यावर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष दे, असे आपण त्याला सांगितले होते. या गोष्टीला आठ दिवस उलटत नाहीत तोच माझा मुलगा जिवानिशी गेला, असे नितीनच्या आईने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
१०जण ताब्यात
पोलिसांनी सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले, आकाश अरूण सुर्वे (तिघेही राहणार खर्डा) यांना अटक केली असून १० मेपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आणखी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या खुन्यांना फाशीच व्हावी अशी अपेक्षा राजू आगे यांनी व्यक्त केली.
एक ना अनेक प्रश्न..
खर्डा येथे पोलीस चौकी आहे. ही घटना घडली तेव्हा या चौकीत एक कॉन्स्टेबल होताही. नितीनला सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीनपर्यंत हालहाल करून मारण्यात आले, परंतु या पोलिसाला त्याची काहीच कल्पना नव्हती. नितीनला गावातून मारहाण करीत नेताना अनेकांनी पाहिले, मात्र कोणीही त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या शाळेतील शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांनीही पोलिसांना कळवले नाही. गावात यापुर्वीही दलितांवर अन्यायाच्या घटना घडल्या आहेत. विकास कामातील भ्रष्टाचाराबद्दल ग्रामसभेत विचारणा करणाऱ्या दलित युवकालाही चार-पाच महिन्यापूर्वी मारहाण करण्यात आली होती.
संघर्ष आणि शिक्षण..
राजू आगे यांचा नितीन हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या थोरल्या दोन बहिणींची लग्ने झालेली आहेत, आणखी एक धाकटी बहीण आहे. नितीनचे वडील दगडफोडीचे काम करतात तर आई मजुरी करते. नितीननेही गॅरेजमध्ये काम करून आपल्या शिक्षणाचा भार स्वत:च उचलला होता.
“गेल्या वर्षभरात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असून सरकारने अधिक गंभीर होऊन कारवाई केली पाहिजे. दलित समाज काँग्रेसऐवजी महायुतीकडे वळल्याने पुढील काळात या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती आहेच.“
रामदास आठवले
“दलितांवरील अत्याचाराची नगर जिल्ह्य़ातील गेल्या सहा महिन्यातील ही चौथी घटना आहे. सत्तेतून आलेली मस्ती आणि आरोपींवर कारवाई करण्यात पोलिसांची दिरंगाई याला कारणीभूत आहे.”
प्रकाश आंबेडकर
“अतिशय गंभीर घटना आहे. दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून शासनातर्फे उत्तम वकील दिले जातील.“
आर. आर. पाटील