गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यासाठी त्यांनी राज्यभर दौरेही सुरू केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय समोर आला नाही. राज्यात आरक्षणाचा वाद सुरू असताना महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलनेही मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. मलाही आरक्षण हवं आहे, असं वक्तव्य गौतमीने केलं. ती प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात मराठा आरक्षण मिळायला हवं आहे का? असा प्रश्न विचारला असता गौतमी म्हणाली, “होय, मला मराठा आरक्षण मिळायला हवं.” मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवं, या जरांगेंच्या मागणीबाबत विचारलं असता गौतमी पुढे म्हणाली, “मला यावर काहीही बोलायचं नाही. मला यात तुम्ही ओढू नका. मलाही आरक्षण हवं आहे. त्यामुळे सर्वांना आरक्षण मिळायला हवं.” तुला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे का? यावरही गौतमीने होकारार्थी उत्तर दिलं आहे.