महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे कायमच चर्चेत असतात. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्रामधील सांगलीमधील एका व्यक्तीलाला बोलेरो देण्याची ऑफर दिली होती. मात्र या मोबदल्यात आपल्याला त्या व्यक्तीने बनवलेली जुगाडू मिनी जीप गाडी द्यावी असं महिंद्रा म्हणाले होते. तरी ही मिनी जीप बनवणाऱ्या अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी स्वत: तयार केलेली गाडी देण्यास नकार दिला होता. घरची लक्ष्मी कशी देऊ असं म्हणत त्यांनी आनंद महिंद्रांची ऑफर धुडकावली होती. मात्र त्यानंतर लोहार यांनी ही ऑफर स्वीकारली आणि आता दत्तात्रय लोहार यांच्या घरासमोर बोलेरो गाडी उभी राहणार आहे. आनंद महिंद्रांना टॅग करुन आज दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा बोलेरो सुपूर्द केल्याच्या कॅप्शनसहीत सांगलीमधील महिंद्रा शोरुमधले फोटो पोस्ट करण्यात आलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय?
थ्री इडियट्स चित्रपटामध्ये आमीर खानने साकारलेलं रँचो नावचं पात्र ज्याप्रमाणे जुगाड करुन व्हॅक्युम क्लिनर बनवतं तशीच गरज म्हणून सांगलीमधील एका व्यक्तीने जुगाड करुन चक्क एक मिनी जीप तयार केलीय. ही जीप आनंद महिंद्रांना एवढी आवडलीय की त्यांनी ही जीपच या व्यक्तीकडून मागताना एक खास ऑफर दिली होती.

आधी शेअर केला व्हिडीओ…
आपल्यापैकी अनेकांनी दुचाकीला किक स्टार्ट करताना पाहिलं असेल, पण जीप किक स्टार्ट करतानाचा एक अनोखा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हाच व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘हे स्पष्टपणे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु आपल्या लोकांच्या साध्या स्वभावाचे आणि ‘किमान’ क्षमतेचे कौतुक करणे मी कधीही थांबवणार नाही. गतिशीलतेची त्याची आवड आश्चर्यकारक आहे,’ अशा कॅप्शनहीत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केलेला.

ही गाडी बनवलीय तरी कोणी?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही गाडी बनवणारी व्यक्ती महाराष्ट्रामधील सांगली येथील असल्याची माहिती समोर आली. अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी दुचाकीचे इंजिन, चारचाकी गाडीचं बोनेट आणि रिक्षाच्या चाकांचा वापर करुन ६० हजारांमध्ये ही भन्नाट किक स्टार्ट जीप तयार केलीय. स्वत:चं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप असणाऱ्या दत्तात्रय यांनी जुगाड करुन तयार केलेली ही जीप ४० ते ४५ किलोमीटर प्रवास एक लिटर पेट्रोलमध्ये करते. सध्या त्यांच्याकडे अनेकांनी अशाप्रकारची जीप बनवून देण्याची ऑर्डर्स येत असल्याचंही सांगितलं. आनंद महिंद्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय यांच्या कारनाम्याची चर्चा देशभरात चर्चा झाली.

आनंद महिंद्रांनी कोणती ऑफर दिलेली…
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आनंद महिंद्रांनी दत्तात्रय यांना ट्विटरवरुन एक ऑफर दिली होती. “स्थानिक प्रशासनाकडून आज नाही तर उद्या या गाडीवर बंदी आणली जाईल कारण ती नियमांमध्ये बसत नाही. त्यामुळेच मी स्वत: त्यांना या गाडीच्या मोबदल्यान बोलेरो देण्याची ऑफर देतोय. त्यांनी निर्माण केलेली ही गाडी महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये आम्हाला प्रेरणा देण्यासाठी संग्राह्य ठेवली जाईल. या गाडीच्या माध्यमातून आम्हाला रिसोर्सनेसची शिकवण मिळेल,” असं आनंद महिंद्रा म्हणाले होते. उपलब्ध गोष्टींमधून अधिक गोष्टी निर्माण करण्याचा धडा आम्हाला ही गाडी पाहून मिळेल असं आनंद महिंद्रा म्हणाले होते. ही ऑफर आधी लोहार यांनी नाकारली होती. मात्र नंतर ही त्यांनी स्वीकारली.

ऑफर नाकारली मग स्वीकारली…
आनंद महिंद्रांनी दिलेल्या या ऑफरसाठी दत्तात्रय यांनी त्यांचे आभार मानले होते. २३ डिसेंबर २०२१ रोजी महिंद्रा कंपनीची एक टीम लोहार यांच्या घराला भेट देऊन या मिनी जीपची पहाणी केली होती. मात्र कष्टाने बनवलेली जीप आम्ही देणार नाही असं लोहार कुटुंबाने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं. मात्र नंतर ही गाडी प्रदर्शनाप्रमाणे मांडली जाणार असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळेल या हेतूने दत्तात्रय यांनी ती महिंद्रा कंपनीला देण्याचं ठरवलं.

आता मिळाली बोलेरो
या साऱ्या प्रकरणानंतर सांगलीमधून अजूनही दोघांनी अशाचप्रकारची जुगाडू गाडी बनवल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र दत्तात्रय लोहार हे महिन्याभरानंतरही चर्चेत आहेत. दरम्यान, काल म्हणजेच २४ जानेवारी रोजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी काही फोटो ट्विट करुन दत्तात्रय लोहार यांना बोलेरो भेट दिल्याचं ट्विटरवरुन सांगितलं. यावेळी त्यांनी आनंद महिंद्रांचेही आभार मानले आहेत. “आज सांगलीमधील सह्याद्री मोटर्समध्ये दत्ताजीराव लोहार यांना महिंद्रा बोलेरो सुपूर्द केली. हा कौशल्याचं कौतुक केल्याबद्दल आनंद महिंद्रांचे आभार,” असं विशाल यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. यासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये दत्तात्रय लोहर यांचे कुटुंबिय आधी गाडीची चावी स्वीकारताना आणि नंतर गाडीमध्ये बसून हसताना दिसत आहे.

ही गाडी घेण्यासाठीही लोहार कुटुंबीय आपल्या मिनी जीपनेच आल्याचं फोटोंमधून दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dattatray lohar a blacksmith from sangali who made mini jeep got bolero as gift after anand mahindra offer scsg
First published on: 25-01-2022 at 08:13 IST