Ajit Pawar : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच वादात अडकले आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी सुरू असताना बाकावर बसून मोबाईलवर ऑनलाईन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एवढंच नाही तर कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधक करत आहेत.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह महायुतीमधील आणखी काही मंत्री वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. पावसाळी अधिवेशना दरम्यान माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय गायकवाड, संजय शिरसाट हे देखील वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, या संदर्भात बोलताना आता अजित पवार यांनी सूचक भाष्य करत महायुतीमधील सर्वच मंत्र्‍यांना सूचक इशारा दिला आहे. ‘कृषीमंत्री असो किंवा आणखी कोणी, तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासन भिकारी असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार म्हणाले की, “मी देखील ही बातमी माध्यमांमध्ये वाचली आहे. मी सुरुवातीलाही सांगितलं की कृषीमंत्री असो किंवा आणखी कोणीही मंत्री असो, कोणत्याही मंत्र्यांनी लोकांसमोर बोलत असताना मग सरकार कोणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे आणि स्वत:च मत मांडलं पाहिजे. आपण कुठेतरी काही बंधने स्वत: ला लावणार आहोत की नाही? याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओची चौकशी सुरू

कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत तुमची भूमिका काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता अजित पवार म्हणाले की, “कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा जो परिसर आहे तो परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत विधानसभा अध्यक्षांनी आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी देखील चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती मला मिळाली आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘त्यानंतर कोकाटेंबाबत निर्णय घेणार…’, अजित पवार

“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वच मंत्र्यांना सांगितलेलं आहे की आपण नेहमी भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि मी देखील सर्वांना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री कोकाटे यांच्याकडून अशाच प्रकारची गोष्ट घडली. तेव्हा देखील मी दखल घेत सांगितलं होतं की असं होता कामा नये. मात्र, तरीही दुसऱ्यांदा पुन्हा असाच प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना जाणीव करून दिली की दोनदा झालंय तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका. मात्र, आता या घटनेबाबत कोकाटे म्हणतात की ते रमी खेळत नव्हते. त्या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय खरं आहे ते सत्य समोर येईल. आता सोमवारी किंवा मंगळवारी मंत्री कोकाटे यांना मी बोलावून समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मी निर्णय घेणार आहे”, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.