देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजुंनी वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून पक्षबांधणीसाठी बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना सध्या ‘सनातन धर्म’ हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

अलीकडेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केलं. मलेरिया, डेंग्यू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं. स्टॅलिन यांच्या विधानानंतर देशाभरात विविध राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला. सनातन धर्मावरील टीकेवरून आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीकास्र सोडलं आहे.

आणखी वाचा-भाजपच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा धोक्यात? सर्वेक्षणातील निष्कर्षांमुळे चिंता वाढली

सनातन धर्माविरोधी बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणं, यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. सनातन धर्मावर बोलणाऱ्यांनी इतर धर्माविषयी बोलून दाखवावं. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर काही बोललं तर मोठा गोंधळ निर्माण होतो. सनातन धर्मावर बोलणाऱ्यांना लोक त्यांची जागा दाखवतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आणखी वाचा- रशियाबाबत मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेला विरोधकांचा पाठिंबा; राहुल गांधींचे परदेशातून समर्थन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनातन धर्मावर होणाऱ्या टीकेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या देशात कुणीही कुणाच्या धर्मावर बोललं नाही पाहिजे. पण तुम्ही इतर धर्मावर बोलून दाखवा. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर बोललात तर मोठा गोंधळ निर्माण होतो. पण सनातन धर्माविरोधात अशाप्रकारे बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष माननं, यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही. पण त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील. सनातन कधीही संपणार नाही. पण सनातनविरोधी ज्यांचे विचार आहेत, त्यांचे विचार नक्की संपुष्टात येतील.”