काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा गड यावेळीही अभेद्य राहणार की, भाजपचे कमळ फुलणार, याची चर्चा टिपेला पोहोचली आहे.
काँग्रेसने या वेळी स्थानिक उमेदवार दिला. प्रचाराची यंत्रणा सूत्रबद्ध पद्धतीने राबविली. राज्यात काँग्रेस पक्षात सर्वाधिक उत्तम नियोजन लातूर मतदारसंघातील प्रचार यंत्रणेचे होते. भाजपने उमेदवार घोषणेला उशीर केला. प्रचार यंत्रणेची जुळवाजुळव करण्यातच भाजपची दमछाक झाली. मात्र, पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या सभेने मतदारसंघाचा नूरच पालटून गेला व संपूर्ण मतदारसंघात मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली. मतदानापूर्वी या वेळी बदल घडणार, काँग्रेसला लातूरची जागा टिकवणे अवघड आहे, या चर्चेने चांगलाच जोर धरला.
लातूरच्या निवडणुकीत ६२.६८ टक्के मतदान झाले. १६ लाख ८२ हजार ६०७ पकी १० लाख ५४ हजार ६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदार संख्या ५ लाख ७६ हजार ६७५, तर महिलांची ४ लाख ७८ हजार ४ आहे. शुक्रवारी (दि. १६) शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे मतमोजणी सुरू होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी सुरू राहील. एकूण ८५ टेबलवर मतमोजणीच्या २४ फेऱ्या पार पडतील व दुपारी तीनपर्यंत निकाल जाहीर होईल. मतमोजणीसाठी सुमारे ६०० कर्मचारी लागणार असून, पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त राहणार आहे. मतमोजणी यंत्रणेतील पर्यवेक्षक व सहायकांना पहाटे ५ वाजता त्यांचा टेबल क्रमांक सांगितला जाणार आहे.
पहिल्या फेरीपासून मतमोजणीची आकडेवारी वेळोवेळी जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या वेळी काँग्रेसच्या मंडळींचा आत्मविश्वास मात्र अभावानेच दिसून येत आहे. लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघाव्यतिरिक्त उर्वरित मतदारसंघात काँग्रेसच्या मंडळींनीही भाजपला आघाडी राहणार, हे खासगीत मान्य केले. लोकांनी बांधलेल्या अंदाजानुसारच निवडणुकीचा निकाल लागेल की वेगळे काही घडेल, हे शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. मात्र, तोपर्यंत गल्लोगल्ली चर्चाचे फड रंगत असून पजाही लावल्या जात आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2014 रोजी प्रकाशित
पुन्हा ‘हात’ की आता ‘कमळ’?
काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा गड यावेळीही अभेद्य राहणार की, भाजपचे कमळ फुलणार, याची चर्चा टिपेला पोहोचली आहे.
First published on: 13-05-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debate on election result