लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतली आहे. ही माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी यांनी स्वतः एका पत्रकार परिषदेत दिली.

या निर्णयामुळे काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळाल्याचे मानले जाते. एमआयएम पक्षाने भाजपच्या विरोधात मतविभागणी टाळण्यासाठी उमेदवार उभा करू नये, असा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. सुरूवातीला या मुद्यावर वाद झाला असता फारूख शाब्दी यांनी उमेदवार उभा करण्याच्या मानसिकतेत होते. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी पक्षातून बाहेर पडणे पसंत केले होते.

आणखी वाचा-सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी काढली भाजपची लाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी विधानसभा निवडणीकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएमने काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज देऊन दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे उभे राहिले असता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाचा पाठिंबा घेऊन एक लाख ७० हजार मते मिळविली होती. भाजपविरोधी मतविभागणीचा मोठा फटका बसून सुशीलकुमार शिंदे यांना एक लाख ५८ हजार मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी २०१७ साली झालेल्या सोलापूर महापालिका निवडाणुकीतही एमआयएमने काँग्रेसची वाट अडवून स्वतःचे नऊ नगरसेवक निवडून आणले होते. काँग्रेसला फक्त १४ नगरसेवक निवडून आणणे शक्य झाले होते. मतविभागणीमुळे भाजपची सत्ता प्रथमच महापालिकेवर आली होती.