गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अनपेक्षित अशा युत्या आणि आघाड्या महाराष्ट्राने गेल्या तीन-चार वर्षात पहिल्या आहेत. परंतु, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या युत्या आणि आघाड्यांपासून लांब आहे. या पक्षाबद्दल वेगवेगळ्या चर्चा अधून मधून होत असतात. शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत विलीन होण्याच्या चर्चा झाल्या. त्यापाठोपाठ शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा अधून मधून होत असतात. त्याचबरोबर भाजपा नेते राज ठाकरे यांना भेटल्यानंतर मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चा सुरू होतात. आता पुन्हा एकदा अशीच चर्चा सुरू आहे.

मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बैठक आज (१४ ऑगस्ट) दुपारी पार पडली. या बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना करण्यासाठी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी राज ठाकरे यांनी आपल्याला (मनसे) भाजपाची ऑफर आहे. परंतु, मी अद्याप कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नाही, असं वक्तव्य केल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने प्रसिद्ध केलं आहे. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर आम्हाला निश्चितच आनंद होईल.

हे ही वाचा >> “हुकूमशाही सरकारविरोधात रस्त्यावर उतरा”, सरन्यायाधीश चंद्रचूड असं म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं…

दीपक केसरकर म्हणाले, राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर आमची (महायुती) ताकद वाढेल. आमच्या विचारधारा एकसारख्या आहेत. एकसारखी विचारधारा असलेले लोक एकत्र आले की सगळेजण व्यवस्थित काम करू शकतात. हिंदुत्व हा राज ठाकरेंचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच मराठी माणसाचा मुद्दाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. हेच विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत. त्यामुळे या युतीत काही अडचण आहे असं मला वाटत नाही. शेवटी निर्णय हा त्यांचा आहे. एवढ्या मोठ्या नेत्याने तो निर्णय घ्यायचा असतो. आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही.