महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक घणाघाती मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला आहे, तर दुसरा भाग उद्या (२७ जुलै) उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित केला जाईल. या मुलाखतीच्या पहिल्या भागात संजय राऊत उद्धव ठाकरे यांना म्हणाले, “तुमच्या नेतृत्वाखालील सरकार मागच्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेलं…” त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं.”
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खेकडा असा केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. या वक्तव्यावरून काल (२५ जुलै) पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यापाठोपाठ आज मंत्री दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
मंत्री दीपक केसरकर यांनी काही वेळापूर्वी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडून नेहमीच अपेक्षा असते की त्यांनी संयमाने बोलावं. परंतु, त्यांनी जर संजय राऊतांसारखी भाषा वापरली तर ते त्यांना शोभत नाही. त्यांचा उद्या वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो. वाढिदवसाच्या दिवशी त्यांनी चांगलं बोलावं. आम्ही त्यांच्याबद्दल आदराने बोलतो. त्यांनीही आदराने बोलावं. नाहीतर मग काही वेळा प्रत्येकजण संयम पाळतोच असं नाही. कोणी एखाद्याने चुकीचं उत्तर दिलं तर ते त्यांच्या मनाला लागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> “सध्याच्या सगळ्या भोंदूगिरीत या माणसाकडून…”, उद्धव ठाकरेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं आहे. परंतु त्यांच्या मार्गापासून तुम्ही (उद्धव ठाकरे) वेगळे झालेले आहात. त्यांच्या (बाळासाहेब ठाकरेंच्या) मार्गावरून वेगळे होऊन ते मुख्यमंत्री झाले, त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही.