महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणातून मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. या ‘जागर यात्रे’वरून शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे.

मनसेच्या ‘जागर यात्रे’ दरम्यान रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली, तर मनसेचे एकाचे दोन आमदार होतील, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. जागर यात्रेतून राष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान नको, असंही त्यांनी म्हटलं आहे. सय्यद यांनी ट्वीट करत ही टोलेबाजी केली आहे.

हेही वाचा- “कोण दीपाली सय्यद, कोण विचारतंय तिला”, एकेरी उल्लेख करत मनसे नेत्याने उडवली खिल्ली

दीपाली सय्यद ट्वीटमध्ये म्हणाल्या, “मनसेच्या ‘जागर यात्रे’ने भविष्यात शॅडो मंत्रीपद वाढेल. पण यात्रेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली, तर एकाचे दोन आमदार होतील आणि युवा नेते शॅडो मंत्री बनतील. यात्रेत राष्ट्राच्या संपतीचे नुकसान नको. देशपांडेना (मनसे नेते संदीप देशपांडे) अजूनही डॅाक्टरांची गरज आहे. ते लवकरच बरे होतील. कोणी व्हिल चेअर मागवा रे!”

हेही वाचा- “राज ठाकरे आहे मी, ‘हा’ आमचा जेनेटिक प्रॉब्लेम”, राज ठाकरेंचा थेट इशारा

विशेष म्हणजे यापूर्वीही दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं होतं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत, असं वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केलं होतं.

हेही वाचा- Video: “मनसेचे १३ आमदार मटक्याच्या आकड्यावर…”, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मनसेची ‘जागर यात्रा’ कशी असेल?

जागर यात्रेची माहिती देताना संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, राज्यातील कुठलीही शहरं घ्या, त्या शहरांना खड्ड्यांच्या समस्येनं ग्रासलेलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य खड्डे आहे. याचा नागरिकांना भयंकर त्रास होतोय. याविषयी सरकार खंत व्यक्त करतानाही दिसत नाही. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच-पाच लाख रुपये मदत देण्यात आली. मात्र, मुंबई- गोवा महामार्गावर जे अपघात झाले, त्यांना नुकसानभरपाई का नाही दिली? कोकणात परप्रांतीयांनी जमिनी विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. या सर्व प्रश्नांवर लोकांना जागृत करण्यासाठी आणि झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २३ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. ही यात्रा तीन टप्प्यात निघेल.