सातारा : महाबळेश्वर ते पोलादपूर रस्त्यावर असणाऱ्या आंबेनळी घाटात दाट धुक्याचा व रस्त्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांची गाडी रस्ता सोडून खाली ‘साईड पट्टी’वर उतरल्याने उलटली. यामध्ये वाहनातील पर्यटक किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली. हे पर्यटक महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघाले होते.पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावर असणाऱ्या आंबेनळी घाटातून हे पर्यटक महाबळेश्वरकडे जात होते. या वेळी घाटात जोरदार पावसासोबतच ढगांची दाटी होती. यामुळे चालकाला समोरील दृश्य दिसत नव्हते.
अशातच रस्त्याकडेचा भागही गेल्या काही दिवसातील पावसाने निसरडा झालेला आहे. या पार्श्वभूमीवर या पर्यटकांचे वाहन रस्त्याच्या कडेला जाताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हे वाहन उलटले. यामध्ये वाहनातील पर्यटक किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. या अपघातानंतर महाबळेश्वरच्या महाडनाक्या पासून पोलादपूर पर्यंत रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे
महाबळेश्वर तालुक्यात सध्या सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे आंबेनळी घाट रस्त्यासह अनेक रस्त्यांच्या कडेचे भाग शेवाळलेले घसरडे झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्याचा अंदाज नसणारे गाड्यांचे चालक चुकतात आणि अपघात होत आहेत. अनेक रस्त्यावर ‘साईड पट्टी’वर रिफ्लेक्टर नसल्याने वाहन चालकाला रस्त्याच्या कडेचा अंदाज येत नाही. या घाट रस्त्यावर दिवसा आणि रात्री गाडी चालविण्यास धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तरीही पर्यटक या मार्गावरून प्रवास करत असतात.