“करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या देशभर ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, परंतु याचा दूध, भाजीपाला, फळे, औषधै, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. हा पुरवठा यापुढेही पूर्ववत नियमित सुरु राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, घराबाहेर पडून खरेदीसाठी गर्दी करु नये,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली असली तरी आपल्या राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळातही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्याबाबत सरकारने खबरदारी घेतली आहे. राज्यातील गरीब, दुर्बल घटकांना रेशन दुकानांवरुन तीन महिन्यांचे अन्नधान्य उपलब्ध करण्याचाही विचार सुरु आहे. राज्य सरकार जनतेची कुठलीही अडचण होऊ देणार नाही, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू देणार नाही,” असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, घराबाहेर पडून करोनाच्या संसर्गाला बळी पडू नये, हा संसर्ग आपल्या घरच्यांपर्यंत नेऊ नये,” असं आवाहन त्यांनी केले आहे. “नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय सेवा आणि अत्यंत निकडीच्या वेळी वाहतुकसेवाही उपलब्ध केली जाईल. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्यासोबत आहे, परंतु आता प्रत्येकानं आपापल्या घरात थांबूनच पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचं पालन करावं, घरीच थांबावं,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar speaks about coronavirus update says dont get panic maharashtra jud
First published on: 24-03-2020 at 23:18 IST