देवळा तालुक्यातील सांगवी गावाचा नावलौकिक वाढला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर सुदर्शन गोपीनाथ जाधव या युवकाने भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ४७ वा क्रमांक मिळविला आणि देवळा तालुक्यातील सांगवी हे गाव थेट देशभरात चमकले.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वनसेवा परीक्षा २०१७ (आयएफएस) चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात सांगवी येथील रहिवासी सुदर्शन जाधव हा विद्यार्थी देशात ४७ वा, तर राज्यात सहावा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला. जिद्द आणि सातत्य या गुणांच्या जोरावर हे यश आपण मिळवल्याचे सांगतानाच स्पर्धा परीक्षेत संयम महत्त्वाचा असतो, हे सुदर्शनने सांगितले. सुदर्शनच्या यशाने गावाबरोबरच तालुक्याच्या लौकिकात भर पडली आहे. दोन वर्षांपासून सुदर्शन पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत होता. त्याचे वडील गोपीनाथ जाधव प्राथमिक शिक्षक असून चांदवड तालुक्यातील डोणगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत. सुदर्शन लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचा. वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षणाचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले.

सुदर्शनचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येवला येथे झाले. त्यानंतर राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्याने कृषी अभियांत्रिकीतून बी. टेक. ही पदवी संपादन केली. पुण्यात महिंद्रा कंपनीत वर्षभर नोकरी केली. त्यानंतर त्याने खासगी कंपनीत नोकरी न करता भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय वनसेवा परीक्षेसाठी मागील वर्षी १८ जूनला पूर्वपरीक्षा आणि तीन ते १३ डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा झाली. दोन्ही परीक्षांमध्ये सुदर्शनने यश मिळविल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे तोंडी परीक्षा झाली. लोकसेवा आयोगाने १९ फेब्रुवारी रोजी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. सुदर्शनने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले हे उल्लेखनीय. त्याला या यशस्वी वाटचालीसाठी नाशिक युनिव्हर्सल फाऊंडेशनचे राम खैरनार, चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सीताराम सोनजे यांचे मार्गदर्शन लाभले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Determination hard work behind sudarshan jadhav success
First published on: 24-02-2018 at 05:10 IST