नागपूर : शरद पवार यांच्या परवानगीनेच शपथविधी झाल्याचे देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरे आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मी तीस वर्षांपासून मी ओळखतो. असत्य बोलून कधीही ते राजकारण करत नाही. खोटे बोलून वा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून ते मोठे झाले नाहीत. फडणवीस जे बोलले ते जबाबदारीने बोलले, असेही बावनकुळे म्हणाले.
विरोधी पक्षातील मराठा, ओबीसी नेत्यांच्या विरोधात तक्रारी आल्यावरच कारवाई केली जात आहे. त्यांनी चौकशीला सामोरे जावे. चुका करायच्या आणि पोलिसांकडून कारवाई झाली तर आकांडतांडव करायचे हे चुकीचे आहे. पोलीस नियमाच्या बाहेर जाऊन कारवाई करणार नाही याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले. फडणवीस यांच्यावर बोलावे इतकी शिवसेना नेते संजय राऊत यांची उंची नाही आणि आता तर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
..तर अनिल देशमुखांचे पाय आणखी खोलात जातील
अनिल देशमुख खोटे बोलत आहेत. त्यांना भाजपमध्ये येण्याचा कोणताही प्रस्ताव दिला नव्हता. ते सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते काही निर्दोष सिद्ध झाले नाहीत, किंवा न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट दिलेली नाही. मी जर तोंड उघडले तर देशमुखांना काही उत्तर देता येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय झाले होते, ते जर मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.