Devendra Fadnavis Stand On Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. अशात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत हे आंदोलन राजकीय आरक्षणासाठी सुरू असल्याचे म्हटले आहे.
ही सगळी धडपड राजकीय आरक्षणासाठी
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलताना भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “तुम्हाला एकच सांगतो, फसवे समाधन हवे असेल तर घ्या. दाखला मिळाल्यानंतर, त्याच्या आधारावर निवडणूक, नोकरी किंवा अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही. त्याच्यासाठी पडताळणी लागते. पडताळणीत हे दाखले टीकत नाहीत. त्यामुळे लगेच या दाखल्यांवर निवडणुका लढवता येत नाहीत.”
राजकीय आरक्षणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “१० टक्के एसईबीसी आणि पूर्वीच्या ईडब्ल्यूएसमध्ये सर्वकाही होते, त्यामध्ये काय नव्हते सांगू तुम्हाला, त्यात राजकीय आरक्षण नव्हते. आता जी सगळी धडपड सुरू आहे ती राजकीय आरक्षणासाठी सुरू आहे.”
शरद पवारांच्या सूचनेवर अजित पवारांटी टिप्पणी
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल मराठा आरक्षणाबाबत बोलताना, सरकारने घटनेमध्ये बदल करत तमिळनाडूप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे विधान केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “जे सूचना करत आहेत ते बरेच वर्षे सरकारमध्ये होते, त्यामुळे मला खोलात जायला लावू नका”, असे विधान केले होते.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात…
अजित पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात फरक असा आहे की, देवेंद्र फडणवीस जे खरे आहे ते ही बोलणे टाळतात, ते माणसे जपतात. अजितदारा आमचे फटकळ आहेत आणि कधी कधी तसे कोणीतर लागतेच. ते त्यांच्या घरातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सगळा इतिहास आहे. ते त्यांचे पुतणे आहेत. त्यावेळी त्यांचे सर्वात जवळचे व्यक्ती अजित पवारच होते. आता वितुष्ठ निर्माण झाले आहे. प्रत्येक गोष्टी अजित पवारांना विचारून केली, म्हणून त्यांना सगळे माहिती आहे.”