महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी करत आहेत. तर राज्य सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यावर ठाम आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी त्यांची मागणी लावून धरल्यानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबियांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. याच काळात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली. या काळात भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात मोठा संघर्ष झाला. दोघांनीही एकमेकांवर एकेरी भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.

छगन भुजबळांचा मनोज जरांगे यांच्याबरोबर संघर्ष चालू असताना त्यांना त्यांच्या पक्षातून हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. तसेच भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘मराठा आरक्षणाचे विरोधक’ अशी टीका होत होती. तर ‘भुजबळ देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे’, ‘ते फडणवीसांची भाषा बोलत आहेत’, अशी टीकादेखील झाली. या टीकेवर भुजबळ किंवा फडणवीस यांनी यापूर्वी कधी प्रतिक्रिया दिली नव्हती. फडणवीस यांनी अखेर आज यावर भाष्य केलं. ते टीव्ही ९ मराठीच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भुजबळ कोणाचा माणूस आहे असं म्हणता येईल का? मी राजकारणात यायच्या आधीपासूनच ते राजकारणात वरिष्ठ पदावर आहेत. मी वयाच्या १९ व्या वर्षी १९८९ साली राजकारणात आलो. त्याच्या चार वर्षे आधी छगन भुजबळ मुंबईचे महापौर होते. काही बाबतीत आमच्यात साम्य आहे. भुजबळांचा इतिहास पाहिला तर त्यांचं मंडल आयोगावरून शिवसेनेशी भांडणं झालं होतं. मंडल आयोगाला शिवसेनेचा विरोध होता. परंतु, भुजबळ मंडल आयोगाचे समर्थक होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली आणि ते शरद पवार यांच्याबरोबर गेले, ते काँग्रेसवासी झाले. त्यानंतर भुजबळ यांनी सातत्याने ओबीसींचा मुद्दा मांडला आहे.

ही गोष्ट खरी आहे की, मी सुद्धा माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून ओबीसींच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. कारण माझं ठाम मत आहे की, आपल्याला सामाजिक न्याय करायचा असेल तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ओबीसींना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होणार नाही. भुजबळांप्रमाणे माझीदेखील पहिल्या दिवसापासून ओबीसींच्या बाजूने भूमिका राहिली आहे. त्यांच्यात आणि माझ्यात हेच सर्वात मोठं साम्य आहे. आम्ही दोघेही ओबीसींच्या बाजूने आहोत.

हे ही वाचा >> ‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

दरम्यान, मी ओबीसींच्या बाजूने असलो तरी मी मराठ्यांच्या विरोधात नाही, असं म्हणत फडणवीस यांनी मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली.