Devendra Fadnavis : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकवेळा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, त्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. यावरूनच राज्याच्या राजकारणात मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेकदा टीका केली.

आता आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलं की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत’, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. त्यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना मोठं विधान केलं. फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असं देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : “संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची माणसं आहेत का?” शरद पवारांचा संतप्त सवाल; म्हणाले, “दर्जा फार…”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, हे देखील सांगितलं पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी (देवेंद्र फडणवीस) घेतले किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. तसेच मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा अयोग्य आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो की जर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, त्यांना मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. पण त्यामध्ये मी अडथळा आणला, मी निर्णय होऊ दिला नाही, तर त्याच क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणामधूनही सन्यास घेईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.