Devendra Fadnavis Warns Party Worker Ahead Of Local Body Elections: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्ध्यात विदर्भ भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ भाजपाच्या कार्यकर्त्यांचे विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत कौतुक केले. याचबरोबर त्यांनी येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याचा आणि निवडणूक काळात पक्षांतर्गत वाद व गटबाजी टाळण्याचा इशारा दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक वाद उकरून काढले जातील. आपण केलेले काम लोकांना समजू नये, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही त्यांनी असे वाद उभे केले. पण आपण आपले काम घेऊन जनतेमध्ये गेलो आणि लोकांनी आपल्याला मतदान केले. त्यामुळे आताही आपल्याला लोकांमध्ये जाऊन सरकारने केलेले काम आणि सरकारचे व्हिजन त्यांच्यासमोर मांडायचे आहे.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला असे वाटते की, आपल्याला आता तयारीला लागायला पाहिजे. या तिन्ही निवडणुका मागेपुढे येतील. जिल्हा परिषद किंवा नगरपालिका यापैकी एकाच्या निवडणुका आधी होतील आणि शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील. २०१७ मध्येही अशाच प्रकारे तीन टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्याचप्रमाणे निवडणूक आयोग या निवडणुका घेईल.”

अनेक पक्ष संपले

“माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहेत. पण भाजपा म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये वाद आहेत. काही ठिकाणी नेत्यांमध्ये, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत. हे वाद फार मोठे नाहीत. पक्ष एक कुटुंब आहे, कुटुंबात कमी-जास्त होत असते. पण निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, एकत्र बसले पाहिजे आणि वाद संपवले पाहिजेत. हे बघा, एकमेकांच्या चढाओढीमुळे अनेक पक्ष संपले. असे प्रकार आपल्या पक्षात होऊ नयेत. जर कोणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल, तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पक्ष करेल, हे लक्षात ठेवा”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वच पक्ष तयारीला

दरम्यान, येत्या काही महिन्यांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र निवडणूक लढवण्याच्या हालचाली करत असल्याचे पाहायला मिळत आहे.