Devendra Fadnavis मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आहे. मागच्या काही महिन्यांपासून ते या प्रश्नी आंदोलन करत आहेत. उपोषणालाही ते अनेकदा बसले आहेत. त्यांना जे आरक्षण सरकारने दिलं ते मुळीच मान्य नाही. उलट त्यांनी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी केली आहे. त्यावर अद्याप काही तोडगा निघालेला नाही. अशात ते कायमच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. ते तुम्हालाच टार्गेट का करतात? या प्रश्नाचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिलं आहे. शांतता रॅलीतही मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका मनोज जरांगे यांनी आता शांतता रॅली सुरु केली आहे. मात्र या सगळ्या आंदोलन काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने टार्गेट केलं आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर ते सातत्याने आरोप करत आहेत हे शांतता रॅलींमधली त्यांची भाषणंही सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधात कट कारस्थान केलं आहे. प्रवीण दरेकरांना बरोबर घेऊन ते कट करत आहेत, मराठा समाजाचं भलं होऊ नये असं त्यांना वाटतं आहे हे मनोज जरांगे गेल्या काही भाषणांमध्ये सातत्याने बोलताना दिसत आहेत. पुण्यातही त्यांनी अशीच टीका केली. हे पण वाचा- Kiran Mane : “मराठा विरुद्ध मराठेतर समाज अशी स्पॉन्सर्ड आग लावायची अनाजीपंती खेळी..”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत पुण्यात काय म्हणाले मनोज जरांगे? "जाती जातींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतो आहे. आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो आहोत. मात्र जे आमच्याशी भांडत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर कुणी येऊ नका. आम्ही आत्ताही तु्म्हाला मानतो आहे आयुष्यभर मानत आहेत. देवेंद्र फडणवीस तुमची काही जहागिरी नाही. तुमचा समाज तुम्हाला मोठं करणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी सगळी षडयंत्रं रचली आणि माझ्या मागे एसआयटी लावली. " असा आरोप मनोज जरांगेंनी केला. सरकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असं तिघांचं आहे. तरीही देवेंद्र फडणवीसांनाच ( Devendra Fadnavis ) का टार्गेट केलं जातं? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावरचं मौन सोडलं आहे. Devendra Fadnavis: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा आश्वासन (PC: Devendra Fadnavis/X) देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? सरकार आमचं तिघांचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मी आणि अजित पवार आम्ही दोघं उपमुख्यमंत्री आहे. पण फक्त मलाच मनोज जरांगे टार्गेट करतात. मी मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात टिकवलं, सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आरक्षण कोर्टात टिकलं नाही. त्यांनी पुढे त्यासाठी काही प्रयत्नही केले नाहीत. शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी कधीही आरक्षण दिलं नाही. १९८२ मध्ये अण्णासाहेब पाटील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करेन, त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. १९८२ पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु झाला. तीनवेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले, सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं सलग राज्य होतं. तरीही मराठा आरक्षण दिलं नाही. आधी मी दिलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिलं." असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले आहेत. मुंबई तकच्या 'बैठक' या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी हे उत्तर दिलं आहे. या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना माझ्याच कार्यकाळात अण्णासाहेब पाटील महामंडळ आम्ही रिव्हावाईव्ह केलं. सारथी योजना सुरु केली. हॉस्टेलची सुविधा सुरु केली. हे सगळे निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले. त्यामुळे तुम्ही प्रश्न मला नाही तर मनोज जरांगेंना विचारा किंवा जवळच्या लोकांना विचारा की हे सगळं असताना ज्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही, मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकताच नाही असं सांगितलं त्यांच्यावर ते एकही शब्द बोलत नाहीत. तिघांचं सरकार असताना फक्त मला टार्गेट करतात याचा अर्थ काय? या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे." असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.