लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात लगेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील. सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकावर असलेल्या पक्षांत उभी फूट पडल्यामुळे राज्यातील राजकारणाचे गणित पुरते बदलले आहे. या दोन्ही पक्षांचा एक गट भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न विचारला जातोय. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

तीन नेत्यांपैकी कोण मुख्यमंत्री होणार?

सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून या सरकारचे नेतृत्व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदी आहेत. या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आगामी काळात आमच्याच पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होईल, असा दावा करतात. त्यासाठी नेते आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचाही आदेश देताना दिसतात. विशेष म्हणजे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचीदेखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे आगामी काळात राज्यात महायुतीचे सरकार आल्यास या तीन नेत्यांपैकी कोण मुख्यमंत्री होणार? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो.

मुख्यमंत्रिपदासाठी काही सूत्र ठरलेले आहे का?

या तिन्ही पक्षांच्या युतीत आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी काही सूत्र ठरलेले आहे का? की ज्याचे संख्याबळ जास्त, त्याचाच मुख्यमंत्री असे ठरवण्यात आले आहे? हेदेखील स्पष्ट नाही. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री संख्याबळावरून ठरणार नाही”

“महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल. मुख्यमंत्र्याची निवड कोणत्या आधारावर केली जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. संख्याबळ आमचेच जास्त असणार आहे. त्यात काही शंका नाही. पण संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तीन पक्ष सध्या एकत्र आहोत. आमचे वरीष्ठ नेते त्यासंदर्भातील निर्णय घेतील,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.