विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकप्रिय उमेदवार किसन वानखेडे यांच्यासाठी आशीर्वाद मागायला मी आलो आहे. आपले आमदार नामदेव ससाणे यांनीही चांगलं काम केलं. त्याआधी उत्तमराव इंगळेही आमदार होते त्यांनीही चांगलं काम केलं. यावेळी नवीन चेहरा देण्याचा आपण प्रयत्न केला. त्यातून किसन वानखेडेंना उमेदवारी दिली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची यवतमाळच्या फुलसावंगीमध्ये सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी किसन वानखेडे यांना निवडून द्या असं आवाहन केलं.

मागेल त्याला सौरपंप या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा

मागेल त्याला सौरपंप अशी योजना आपण आणली आहे. जो शेतकरी सौर पंप लावेल त्याला पुढची २५ वर्षे वीज बिल भरावं लागणार नाही. शेतकरी आम्हाला सांगायचे की रात्रीची वीज देण्याऐवजी आम्हाला दिवस वीज द्या. आता आम्ही एका कंपनीला काम दिलं. सोलर पार्कही आपल्या भागात उभं राहतं आहे. आपलं सरकार दोन वर्षांत हे काम करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना २४ तास ३६५ दिवस मोफत वीज मिळेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णयही महायुतीने घेतला आहे. मध्यमवर्गीय घरात असेल तर ते सांगतात आम्ही मुलाला शिकवू. मुलगी कितीही शिकली तरीही तू लग्न करुनच दुसऱ्या घरी जाणार आहे असं सांगितलं जातं. मात्र आपल्या सरकारने मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे याचीही आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

महाभकास आघाडी असा मविआचा उल्लेख

लाडकी बहीण योजना आणली तेव्हा महाभकास आघाडीचे लोक सांगायचे योजना शक्य नाही, पैसे मिळणारच नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे पैसे आम्ही आमच्या अडीच कोटी बहिणींच्या खात्यात टाकले आहेत. मात्र लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही जसे तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे सावत्र भाऊही आहेत. ते सावत्र भाऊ योजना बंद करायचा प्रयत्न करत आहेत. नाना पटोलेंचे नेते कोर्टात गेले होते. लेक लाडकी, लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी ते कोर्टात गेले होते. त्यांनी या योजनेवर बंदी आणायची मागणी केली होती. आम्ही लढलो आणि ही योजना बंद करु दिली नाही. उद्धव ठाकरेंनीही घोषणा केली म्हणाले माझं सरकार आलं की महायुती सरकारचे निर्णय स्थगित करणार आहे. नाना पटोले आणि शरद पवारही हेच बोलले. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा- ‘भारत जोडो’तून अराजक पसरवण्याचे काम; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका

लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार

आपला आमदार या भागातून निवडून आला तर लाडकी बहीण योजना काही बंद होणार नाही. उलट आमचं सरकार हा निधी १५०० वरुन २१०० रुपये करणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना स्थगित करण्याची तयारी सुरु होईल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींवर जोरदार टीका

एकीकडे काम करणारं, तुमच्यामध्ये राहणारं सरकार आहे. तर दुसरीकडे आपल्याला माहीत हे राहुल गांधी आले होते. संविधान बचाओ रॅली केली. त्यांच्या हाती लाल पुस्तक होतं. काही लोकांच्या हातात पण हेच पुस्तक होतं. उघडून पाहिलं तेव्हा ते कोरं पान होतं. संविधानाचा अपमान करणारे राहुल गांधी आता संविधान बचाओचा नारा देत आहेत. अमेरिकेत जाऊन सांगतात आरक्षण रद्द करायचं आहे. भारतात येऊन सांगतात आरक्षण द्यायचं आहे. हे दुटप्पी लोक आहेत त्यांना जनसामान्यांशी काहीही घेणं देणं नाही. विकासाची गंगा तु्मच्या दारापर्यंत पोहचवण्याचं काम महायुती सरकार करतं आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.