Devendra Fadnavis News: मुंबईत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. गुरुवारी या परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या बांबू धोरणासंदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केलं. महाराष्ट्र गीताने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मात्र, समारोपावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून हा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं कार्यक्रमात?

आंतरराष्ट्रीय बांबू दिनाच्या निमित्ताने आयोजित परिषदेच्या पहिल्या दिवसाचे कार्यक्रम गुरुवारी पार पडले. कार्यक्रमाचा समारोप ‘महाराष्ट्र गीता’ने करण्यात आला. पण हे महाराष्ट्र गीत कार्यक्रमाच्या आयोजकांनी किंवा कुठल्या तंत्रज्ञाने वाजवलं नसून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर गाणं लावलं. समारोपासाठी मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवर मंडळी उठून उभी राहिली. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने होईल असं सूत्रसंचालकांनी जाहीर केलं. पण काही क्षण जाऊनही गाणं काही सुरू होत नव्हतं.

गाणं वेळेवर सुरू होत नसल्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये काहीशी चलबिचल सुरू झाली. गाण्यासाठी ठेवलेल्या यंत्रणेमध्ये काही अडचण आल्याचं स्पष्ट झालं. पण त्याचवेळी प्रसंगावधान राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिशातून मोबाईल काढला आणि ते आपल्या जागेवरून माईकच्या दिशेनं निघाले. इतर मान्यवर त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहात होते. माईकजवळ जाऊन देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्र गीत लावलं आणि मोबाईल माईकजवळ ठेवला. त्यामुळे कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलमधील महाराष्ट्र गीताने झाली.

“जय जय महाराष्ट्र माझा…मुंबईत आज आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र गीत लावताना तांत्रिक अडचण आली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवत आपल्या मोबाईलमधून महाराष्ट्र गीत माईकसमोर लावले आणि समयसूचकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले”, अशी पोस्ट देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाकडून एक्सवर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत संबंधित प्रसंगाचा व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे.

बांबू खरेदीसाठी स्वतंत्र धोरण तयार करणार – देवेंद्र फडणवीस

“सध्या बांबू पूर्ण विकसित होण्यासाठी तीन वर्षे लागतात, त्याऐवजी बांबू दोनच वर्षात विकसित होईल, असे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गटविकास अधिकारी आणि कृषी विभागाकडून योजना राबवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यापुढे तसे होणार नाही, याची काळजी घेऊ. बांबूसाठी शाश्वत बाजार व्यवस्था तयार होईल. सध्याच्या मनरेगा योजनेतील अनुदानाव्यतिरिक्त एनटीपीसी आणि राज्याच्या महानिर्मितीमार्फत बांबू लागवडीसाठी किंमत ठरवून शेतकऱ्यांकडून बांबू खरेदी करण्यासाठी एक स्वतंत्र धोरण देखील निश्चित करण्यात येईल”, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.