पंढरपूर : मराठी भाषा गौरवाच्या मेळाव्यात ‘रुदाली’ भाषण ऐकायला मिळाले अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. तर, राज ठाकरे यांचे आभार मानून श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील, असेही ते म्हणाले. आम्ही मराठी आहोत आणि मराठीचा अभिमान आहे, असेदेखील फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. कारण त्यांनी दोन बंधू एकत्र येण्याचे श्रेय मला दिले. यामुळे कुठे तरी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील.
मला सांगण्यात आले होते, की विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी तर रुदालीचे भाषणही झाले. मराठीबद्दल एक शब्दही न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या असा प्रकार तिथे सुरू होता. हा काही मराठीचा विजय नव्हता, ही रुदाली होते. या रुदालीचे दर्शन त्या ठिकाणी आपण घेतले आहे. मुळात त्यांना त्रास याचा आहे, की २५ वर्षे महापालिका असताना दाखवण्यालायक ते काहीही काम करू शकले नाहीत, असे फडणवीसांनी टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलला, ते सगळ्यांनी पाहिले. त्यांच्या काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळ, अभ्युदयनगर, पत्रा चाळ येथील मराठी माणसांना त्याच ठिकाणी घरे दिले. याची असूया त्यांच्या मनात आहे. मुंबईतला मराठी माणूस असो, की अमराठी; सगळेच आमच्या बरोबर आहेत. आम्ही मराठी आहोत, मराठी असण्याचा अभिमान आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहेत. हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे,’ असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही संतांच्या पालखीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले. मनाला शांती, ऊर्जा मिळाली, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.