सत्ता आल्यावरही धनगरांना आरक्षणा देऊ, या आश्वासनाची पूर्तता सत्ता आल्यावर अजूनही होऊ न शकल्याने होणारी फजिती टाळण्यासाठीच धनगर आरक्षणाच्या मुद्यावर भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय समाज पार्टीच्या नागपूरच्या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरविल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात धनगर आरक्षणाच्या मुद्यावर तत्कालीन सरकारच्या विरोधात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यात आंदोलन पेटविले होते. हे जनमत लक्षात घेऊन भाजपने या मागणीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीत सहभागी झाला होता. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला राजकीय लाभही झाला होता. राज्यात सत्तांतर झाल्यावर धनगर समाज आरक्षणाकडे डोळे लावून बसला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी यापूर्वी नागपूरमध्येच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मेळावा घेण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला उपस्थित होते. धनगर आरक्षणाच्या संदर्भात फडणवीस हे काय बोलले होते, याची चित्रफितच यावेळी आयोजिकांनी त्यांना दाखविली होती. आता आश्वासने नको, तर घोषणा हवी, अशी नारेबाजी त्यावेळी उपस्थितांनी केली होती. त्यावेळी फडणवीस यांनंी राज्याच्या महाअधिवक्तयांकडून सल्ला घेऊन या संदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन दिले होते. तेही अद्याप पूर्ण झाले नाही. याच पाश्र्वभूमीवर २९ ऑगस्टला नागपूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा १२ व्या वर्धापन दिन कार्यक्रम झाला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला व बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी वेळही दिली होती; मात्र ते आले नाहीत. यापूर्वीच्या मेळाव्याप्रमाणे याही मेळाव्यात आश्वासनांची आठवण करून दिल्यास फजिती होईल, हे लक्षात घेऊनच येणे टाळल्याचे बोलले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2015 रोजी प्रकाशित
फजिती टाळण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची रासपच्या मेळाव्याकडे पाठ
सत्ता आल्यावरही धनगरांना आरक्षणा देऊ, या आश्वासनाची पूर्तता सत्ता आल्यावर अजूनही होऊ न शकल्याने होणारी फजिती टाळण्यासाठीच धनगर आरक्षणाच्या मुद्यावर ...
First published on: 02-09-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis not to attend rashtriya samaj paksha conference