लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूरच्या कन्हानमध्ये जाहीर सभा पार पडली. ही सभा नागपूर आणि भंडारा गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठी एकत्रित होती. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसकडून अनेकदा संविधान धोक्यात असल्याची टीका करण्यात आली होती. यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य करत प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“निवडणूक जवळ आली की, संविधान बदलणार, संविधान बदलणार असे काँग्रेसच्या पोपटांचे सुरु होते. पण पोपटांनो हे लक्षात ठेवा, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही. या देशात नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत, त्यांनी सांगितले होते की, गीता, बायबल, कुराण पेक्षाही देशाचे संविधान महत्वाचे आहे. त्यामुळे माझा काँग्रेसला प्रश्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. त्यांच्या स्मारकासाठी किती संघर्ष झाला.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”

यासाठी रामदास आठवले, कवाडे साहेब जेलमध्ये गेले. मात्र, त्यावेळी एक इंचही जमीन मिळाली नाही. कौरवांनी पांडवांना सांगितले होते की, सुईच्या टोकाईतकी जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही. तशा पद्धतीने काँग्रेसच्या डॉ.मनमोहन सिंग यांच्या सरकारने सांगितले होते, सुईच्या टोकाईतकी जमीनदेखील मिळणार नाही. पण २०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला एक इंचही जागा मिळत नाहीये. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ सांगितले, ३ हजार कोटींची जागा महाराष्ट्र सरकारला द्या. त्यानंतर आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक तयार होत आहे”, असे फडणवीस म्हणाले.