महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले? चर्चा नेमके कुठे अडली? अमित शाहांबरोबरच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यातच आता ९ एप्रिल रोजी मनसेचा मुंबईत पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे महायुतीच्या सहभागाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. पण या मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महायुतीतील सहभागाबाबत माध्यमांशी बोलताना भाष्य केले. “मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हापासून आमची जवळीक वाढली. राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा : “बारामतीत सुप्रिया सुळेंना मत देणं म्हणजे…”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मनसेबरोबर युतीसंदर्भात आमच्या चर्चा झाल्या आहेत. मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे हे पहिले व्यक्ती होते की २०१४ साली त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जाहीरपणे भूमिका घेतली होती. त्यानंतर मधल्या काही काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली. मात्र, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे विकास केला. ज्यांच्यासाठी समाज प्रथम आहे, अशा सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. त्यामुळे मला विश्वास आहे की, राज ठाकरे यांची मनसेही महायुतीबरोबर निश्चित येईल. याबाबतचा निर्णय राज ठाकरे यांना घ्यायचा आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसेच्या टीझरमध्ये काय आहे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा मुंबईत उद्या पार पडणार आहे. या मेळाव्याचा टीझर मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये राज ठाकरे म्हणतात, “गेल्या काही आठवड्यापासून आपल्या पक्षाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे पाहत आहे. तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारुन भंडावून सोडलं असेल. मात्र, या सगळ्यावर बोलण्याची वेळ आलीय. नक्की काय घडतेय, घडवले जातेय हे सांगण्याची वेळ आली आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, आपल्याशी मला बोलायचे आहे”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.