आगामी महापालिका निवडणुका किंवा विधानसभा निवडणुकांसाठी मनसे आणि भाजपा यांच्यामध्ये युती होणार का? याची तुफान चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. ही चर्चा दोन्ही पक्षांकडून जशी पूर्णपणे स्वीकारण्यात आलेली नाही, तशीच ती पूर्णपणे नाकारण्यात देखील आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे यातून वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. भाजपा आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार यावर ही भेट म्हणजे शिक्कामोर्तब असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

आज सकाळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संपावर देखील भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाडव्याच्या दिवशी आशिष शेलार यांनी देखील राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली होती. प्रसाद लाड यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे संजयय राऊत यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे ‘शिवतीर्थ’वर राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे.