Devendra Fadnavis On Increasing Amout Of Ladki Bahin Yojana: गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून सरकार राज्यातील गरजू महिलांना दर महिना थेट आर्थिक लाभ देते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील काही नेत्यांनी या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची आश्वासने दिली होती. मात्र, निवडणूक होऊन जवळपास वर्ष होत आले तरी वाढ झाली नाही. आज रक्षाबंधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या रकमेत कधी वाढ होणार याबाबत घोषणा केली आहे.

सावत्र भावांनी आडकाठी टाकण्याचा प्रयत्न केला

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही लाडक्या बहिणींसाठी प्रयत्न करत असताना, काही सावत्र भाऊ त्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात. जसं ‘लाडकी बहीण’ योजनेविरोधात कोर्टात गेले. तिथे काही झाले नाही, म्हणून म्हणाले की योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पैसे सरकारच्या खात्यातून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जातात. यात भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात आहे.”

“या योजनेच्या ज्या प्रामाणिक लाभार्थी भगिनी आहेत. त्यांना आम्ही हा लाभ देत राहणार आहोत. शेवटी फक्त भाषणबाजी कोण करतं आणि कृती कोण करतं, हे आपल्या माता-भगिनींना कळतं. म्हणून कोणी कितीही खोटं आणि चुकीचं बोललं तरी बहिणींचे आशीर्वाद सख्ख्या भावांच्या पाठिशीच राहतात. सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्र भावांसारखे वागतील, तोपर्यंत बहिणी त्यांना थारा देणार नाहीत”, असे ते पुढे म्हणाले.

निधीत वाढ करणार आहोत

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर चालत महाराष्ट्रातही अनेक योजना सुरू केल्या. त्यातील ‘लाडकी बहीण’ योजना महत्त्वाची आहे. अनेकांना वाटायचं की हे भाऊ निवडणुकीपुरते पैसे देतील आणि निवडणूक झाली की सावत्र भावांसारखे पैसे बंद करतील. विरोधकांनी एक वावटळ उभी केली होती, ती बाजूला झाली. निवडणुकीनंतरही ही योजना सुरूच ठेवली. पुढील पाचही वर्षे ही योजना सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीत वाढही आम्ही करणार आहोत.”

काही हुशार भाऊ…

यावेळी काही पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा दुरुपयोग करत लाभ मिळवल्याच्या प्रकारांवरही फडणवीस यांनी भाष्य केले. “काही लोकांनी याचा थोडासा दुरुपयोगही केला. काही इतके हुशार भाऊ निघाले की त्यांनी बहिणींच्या नावावर अर्ज भरले आणि पैसे घेणं सुरू केलं”, असे ते म्हणाले.