Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil Protest : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज (३१ ऑगस्ट) या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. आझाद मैदानावर चालू असलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पक्षांचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, तिथून निघताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. तसेच त्यांच्या कारवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या.
आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घातल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “असं करणं योग्य नाही. शेवटी कुठलेही नेते आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेले असतील तर त्यांना योग्य वागणूक मिळायला हवी. त्यांना घेराव घालणं, बाटल्या फेकणे हे असले प्रकार करून, हुडदंगबाजी करून काहीच मिळणार नाही.” फडणवीस टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
आंदोलनाच्या ठिकाणी नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे तिथून निघत असताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारला घेराव घालत कार पुढे जाऊ देण्यास नकार दिला. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘शरद पवारांनी मराठ्यांचं वाट्टोळं केलं’ अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या.
खासदार सुळे काय म्हणाल्या?
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मनोज जरांगे यांनी चार दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही, त्यामुळे त्यांना प्रचंड थकवा आलेला आहे. ते म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करा की आंदोलनस्थळी स्वच्छतेची आवश्यकता आहे. तसेच आंदोलनस्थळी वीजेच्या दिव्यांची देखील व्यवस्था नाही.’ याबाबत मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोलणार आहे.”
सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खासदार सुळे म्हणाल्या, “मनोज जरांगे यांच्यासह सर्व मराठा आंदोलकांचा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माजी हात जोडून विनंती आहे की सर्वपक्षीय नेत्यांना बोलवा, बैठक बोलवा, विधानसभेचं एकदिवसीय अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणावर मार्ग काढा.”