Devendra Fadnavis Reacion on Cabinet Expansion : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस व मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखी १० असे मिळून एकूण २२ दिवस लागले. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या आहे. त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. नागपुरात आयोजित शपथविधी समारंभात ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यात याआधी देखील महायुतीचंच सरकार होतं. मात्र, महायुतीच्या नव्या सरकारमध्ये २० नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, दुसऱ्या बाजूला अनेक माजी मंत्र्यांना, महायुतीमधील मोठ्या नेत्यांना डावलण्यात आलं आहे. या मोठ्या नेत्यांना पक्षांनी का डावललं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या समाजांना, जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे”. यावर त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. अनेक माजी मंत्री या मंत्रिमंडळात दिसत नाहीत. याची काय कारणं आहेत? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यामागे वेगवेगळी कारण आहेत. मी माझ्या पक्षापुरतं उत्तर देईन. अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणांमुळे मंत्रिमंडळात घेतलं जात नाही. उदाहरणार्थ पक्षाने एखाद्या नेत्याला वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलं असेल तर त्या नेत्याला आम्ही मंत्रिमंडळात घेत नाही. भाजपात कोणाला पक्षात मोठी जबाबदारी द्यायची असेल तर आम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत नाही. तसेच असेही असू शकतं की एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणं टाळलेलं असू शकतं.

हे ही वाचा >> फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा? तिन्ही पक्षांकडून सहकार पंढरीला झुकतं माप; साताऱ्यातील चौघांना संधी

देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते, माजी मंत्री दिसत नाहीत. सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण ही त्यापैकी प्रमुख नावं आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमचं मंत्रीमंडळ सर्वसमावेशक आहे : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही आमच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या समाजांना स्थान दिलं आहे. ४० टक्के नवे नेते या मंत्रिमंडळात आहेत. सर्व प्रकारचे चेहरे आहेत. जुने जाणते नेते देखील या मंत्रिमंडळात आहेत. आम्ही अनेक महिलांना देखील संधी दिली आहे. वेगवेगळ्या समाजांना संधी दिली आहे. ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे. आमचं मंत्रिमंडळ सर्वसामावेशक असं आहे.