राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फोडाफोडीपेक्षा प्रगतीच्या राजकारणाकडे पाहण्याची सुबुद्धी गणरायाने राज्यकर्त्यांना द्यावी. यावर्षी त्याची फारच गरज आहे, असा टोला जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला होता. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

“गणरायाची ख्याती त्याच्या बुद्धीमत्तेवर आहे. बुद्धीसाठी गणपती सर्वांना ज्ञात आहे. ती सुबुद्धी महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांना देवो. फोडाफोडीपेक्षा प्रगतीच्या राजकारणाकडे पाहण्याची सुबुद्धी गणरायाने राज्यकर्त्यांना द्यावी. यावर्षी त्याची फारच गरच आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

“…याची गणराय जयंत पाटलांना सुबुद्धी देईल”

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जयंत पाटलांना सणवार काहीच माहिती नसतं. त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. सणासुदीला कसं बोललं पाहिजे, हे त्यांना समजत नाही. काय करायचं आपण? सोडून द्या. पुढं असं बोलणार नाहीत, याची गणराय जयंत पाटलांना सुबुद्धी देईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य”

‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत’, असं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. यावरही देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी मांडलं आहे.